वॉशिंग्टन - गेल्या दीड वर्षांपासून कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात धुमाकूळ घातला आहे. जगभरात कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल 21 कोटींचा टप्पा पार केला आहे. तर लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनामुळे अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रगत देशही हतबल झाले आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. जगभरात कोरोना लसीकरण वेगाने सुरू असून आतापर्यंत कोट्यवधी लोकांनी लस घेतली आहे. चीनमधून संसर्गास सुरुवात झालेल्या या व्हायरसबाबत अजूनही वेगवेगळी मतमतांतरे मांडली जात आहेत. यादरम्यान अमेरिकेतील ज्येष्ठ संसर्गजन्य रोगतज्ज्ञ डॉक्टर अँथनी फौसी यांनी एक दावा केला आहे.
कोरोना लसीचे सामान्यतः दोन डोस जगभरात दिले जात आहेत. अमेरिकेसह काही देशांमध्ये, हाय रिस्क असलेल्या लोकांना लसीचे तीन डोस देखील दिले जात आहेत. पण आता डॉक्टर अँथनी फौसी यांनी लोकांना येत्या काळात कोरोना लसीच्या तीन डोसची आवश्यकता असू शकते असं म्हटलं आहे. त्यांच्या मते, दोन डोस घेतल्यानंतर काही महिन्यांनी, कोरोनाशी लढण्यासाठी अँटीबॉडी कमी होत आहेत. त्यांनी या संबंधित काही डेटा देखील दाखवला आहे. फौसी यांनी इस्रायलचा डेटा शेअर केला. इस्रायलमध्ये मोठ्या संख्येने लोकांना लसीचा बूस्टर डोस देण्यात आला आहे. आकडेवारीनुसार, 10 लाख लोकांना ज्यांना लसीचे तीन डोस देण्यात आले आहेत. त्यांच्यावर त्यांचा खूपप चांगला परिणाम झाला आहे. या सर्वांना फायझरची लस देण्यात आली.
"ज्यांना लसीचा तिसरा डोस देण्यात आला, त्यांना कोरोना होण्याचा धोका फक्त 10 टक्के"
कोरोना लस दिल्यानंतर 12 दिवसांनी त्याच्यावर रिसर्च करण्यात आला. यानुसार ज्यांना लसीचा तिसरा डोस देण्यात आला, त्यांना कोरोना होण्याचा धोका फक्त 10 टक्के राहिला आहे. तसेच अमेरिकेत 20 सप्टेंबरपासून बूस्टर डोस दिले जातील. लसीचा तिसरा डोस दुसऱ्या डोसनंतर 8 महिन्यांनी दिला जाईल. अमेरिकेतील बहुतेक लोकांना फायझर आणि मॉडर्नाची लस देण्यात आली आहे. या दोन्ही लसींचे पहिले दोन डोस 28 दिवसांच्या अंतराने दिले जातात. यापूर्वी अमेरिकेत फक्त हाय रिस्क असलेल्या रुग्णांना बूस्टर डोस देण्याची परवानगी देण्यात आली होती. एका इंग्रजी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
युरोपमध्ये कोरोनाचा प्रकोप! डिसेंबरपर्यंत 2 लाख लोकांच्या मृत्यूची शक्यता; WHO ने व्यक्त केली भीती
युरोपमध्ये कोरोनाचा प्रकोप पाहायला मिळणार आहे. डिसेंबरपर्यंत 2 लाखांहून अधिक लोकांच्या मृत्यूची शक्यता वर्तवण्यात येत आहे. WHO ने ही भीती व्यक्त केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) युरोपियन देशांमध्ये कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने या वर्षी 1 डिसेंबरपर्यंत युरोपमध्ये सुमारे 2 लाख 36 हजार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होऊ शकतो अशी भीतीही व्यक्त केली आहे. यावेळी कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटने कहर केला असून रुग्णांची संख्या आणि मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. युरोपमध्ये कोरोनामुळे आतापर्यंत 1.3 मिलियन लोकांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. कोरोनाचा वेगाने प्रसार होण्यामागे तीन कारण असल्याचं म्हटलं जात आहे. उच्च ट्रान्समिशन दर, लसीकरणाचा मंदावलेला वेग आणि निर्बंधांमध्ये दिलेली सूट याचा यामध्ये समावेश आहे.