वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जगभरातील रुग्णांच्या संख्येने तब्बल 46 कोटींचा टप्पा पार केला असून एकूण संख्या 464,669,851 वर पोहोचली आहे. कोरोनामुळे 6,083,115 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 396,993,860 जण बरे झाले आहेत. कोरोनामुळे अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. जगातील काही देशांमध्ये पुन्हा एकदा कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कमी चाचण्या आणि अनेक आठवडे संसर्ग कमी होऊनही कोरोना प्रकरणांमध्ये जागतिक वाढ होण्याचा धोक्याचा इशारा दिला आहे.
शिन्हुआ वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, WHO ने वाढत्या केसेसवर चिंता व्यक्त केली आहे. आशियातील काही भागांमध्ये लसीकरण वाढवण्याचं आणि कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्याचं आवाहन केलं आहे. डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस गेब्रेयसस यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं, की कोरोनाच्या चाचण्या कमी असूनही जागतिक स्तरावर रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे येत्या काळात कोरोनाच्या उद्रेकात वाढ होईल, असं अपेक्षित आहे. कोरोनाने अनेक देशांचं पुन्हा एकदा टेन्शन वाढवलं आहे. संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.
डब्ल्यूएचओच्या कोविड-19 टेक्निकल प्रमुख मारिया वेन केरखोव यांच्या मते, गेल्या आठवड्यात 11 मिलियनपेक्षा अधिक केसेस नोंदवल्या गेल्या आहेत. गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात रुग्णसंख्येत आठ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ही रुग्णसंख्या कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे वाढत असल्याचंही त्यांनी सांगितलं. ही वाढ अशा भागात होण्याची शक्यता जास्त आहे, ज्या भागात कोरोनाचे निर्बंध पूर्णपणे हटवले गेले आहेत, असं ते म्हणाले. 'झी न्यूज हिंदी'ने याबाबतचे वृत्त दिले आहे.
चीन पाठोपाठ आता 'या' देशात कोरोनाचा हाहाकार; एका दिवसात तब्बल 6 लाख नवे रुग्ण
चीनपाठोपाठ आता दक्षिण कोरियामध्ये कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. कोरोनाचा भयावह वेग पाहायला मिळत असून रुग्णांच्या संख्येने रेकॉर्ड मोडला आहे. नवा उच्चांक गाठला आहे. दक्षिण कोरियामध्ये कोरोनाचे एका दिवसांत तब्बल 6 लाखांहून अधिक नवीन रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत जगातील कोणत्याही देशात एकाच दिवसात कोरोना संसर्गाची इतकी प्रकरणे समोर आलेली नाहीत. दक्षिण कोरिया हा व्हायरसमुळे सर्वात कमी मृत्यूदर असलेल्या देशांमधील एक देश आहे. सर्वसाधारणपणे, कोरोना संसर्गाचा दर जसजसा वाढत जातो, तसतसा त्याचा मृत्यूही वाढतो, परंतु दक्षिण कोरियामध्ये असे दिसून आले नाही. दक्षिण कोरियामध्ये लसीकरण दर 88% आहे. यासोबतच जगातील सर्वाधिक बूस्टर शॉट्स असलेल्या देशांमध्येही त्याचा समावेश आहे. विशेषत: वृद्धांना येथे मोठ्या प्रमाणात बूस्टर डोस देण्यात आला आहे.