मुंबई : कोरोना संक्रमणाच्या पहिल्या टप्प्यात इटलीने मृत्यूचे थैमान अनुभवले, परंतु त्या वेळी कधीही फारशी भीती वाटली नव्हती. मात्र, कार्यालयातील माझ्या सहकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे आजच निष्पन्न झाले. एका शाळेतील विद्यार्थीही संशयास्पद आढळला. त्यामुळे माझ्या मनात कधी नव्हे एवढे चिंतेचे काहूर माजले आहे. देशात पुन्हा लाॅकडाऊनचे बिगूल वाजत आहे. हिवाळ्यात कोरोनाच्या झळा तीव्र होण्याची भीती आहे. परिस्थिती चिंताजनक असून पुढील काही महिने आमच्यासाठी कसोटीचे असतील, असे इटलीत वास्तव्याला असलेले प्रवीण जगदाळे यांनी अस्वस्थता मांडताना ‘लोकमत’ला सांगितले.मे महिन्यात इटलीत दिवसाकाठी १२-१२ हजार रुग्ण आढळत होते. त्यापैकी ८०० ते ९०० जणांचा मृत्यू होत होता. मृतदेहांचे दफन शक्य होत नसल्याने विद्युत दाहिन्या सुरू झाल्या होत्या. परंतु, सुदैवाने ही लाट हळूहळू ओसरली. सप्टेंबर, ऑक्टाेबर महिन्यांत रुग्णसंख्या शंभराच्या पलीकडेही जात नव्हती. निर्बंध कमी झाले. जनजीवन पूर्वपदावर येत होते. उन्हाळी सुट्टीत पर्यटनाला चालना देण्यासाठी सरकारने चक्क सवलतींचे पॅकेज जाहीर केले. त्यामुळे सहलींचा आनंद लुटण्यासाठी समुद्रकिनाऱ्यांवर तुफान गर्दी लोटली. अनेक जणांनी परदेशी वाऱ्या केल्या. तेथेच घात झाला आणि कोरोनाने पुन्हा हातपाय पसरण्यास सुरुवात केली असे मला वाटते.ऑक्टोबरच्या उत्तरार्धात जणू कोरोनाही सुट्टी संपवून पुन्हा दाखल झाला आहे. दैनंदिन रुग्णसंख्या २०-२२ हजारांचा पल्ला ओलांडतेय. परंतु, मृतांची संख्या २०० च्या पुढे जात नाही हे सुदैव आहे. मृतांमध्ये ज्येष्ठांचा भरणा जास्त असून ओल्डएज होममध्येच ते राहतात. त्यांनाच सर्वाधिक धोका असल्याने त्यांची काळजी घेणे जास्त महत्त्वाचे असल्याचे जगदाळे म्हणाले.
coronavirus: इटलीत पुन्हा लाॅकडाऊनचे बिगूल, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे चिंतेचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2020 5:23 AM