वॉशिंग्टन - जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 265,122 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 38 लाखांहून अधिक लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. जगातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची संख्या 3,822,316 वर पोहोचली आहे. तर दुसरीकडे 1,303,869 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे. जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. सर्वच देश कोरोनाशी सामना करत आहेत. संपूर्ण जगाला संकटात टाकणाऱ्या कोरोनाचा प्रसार चीनच्या वुहान येथील प्रयोगशाळेतून झाल्याचा दावा पुन्हा एकदा अमेरिकेने केला आहे.
अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिओ यांनी कोरोना विषाणूची निर्मिती चीनमधील प्रयोगशाळेत करण्यात आली, याचे ठोस पुरावे अमेरिकेच्या हाती लागले आहेत असं म्हटलं आहे. तसेच चीनने ज्या पद्धतीने कोरोना साथीचा मुकाबला केला, त्या गोष्टी संशयास्पद आहेत, असेही ते म्हणाले. 'मी मिळालेली संपूर्ण माहित जाहीर करू शकत नाही. पण कोविड-19 च्या प्रसाराबाबतची महत्त्वाची माहिती आमच्याकडे आहे आणि त्याचा प्रसार होण्यास वुहानची प्रयोगशाळाच कारणीभूत आहे यावर आम्ही ठाम झालो आहोत' असं पॉम्पिओ यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.
कोरोना व्हायरसने अमेरिकेत सर्वाधिक म्हणजे 70 हजार बळी घेतले आहेत. तसेच अमेरिकेमध्ये रुग्ण आणि मृतांची संख्या झपाट्याने वाढत आहे. 'अमेरिकेत जे घडलं आहे ते घडायला नको होतं. पण हा कोरोना व्हायरस चीनच्या वुहानमधून आलाय हे सर्वांनाच माहिती आहे. चीनला या व्हायरसची डिसेंबर महिन्यातच संपूर्ण माहिती होती, पण त्यांनी दिरंगाई केली. जागतिक आरोग्य संघटनादेखील चीनच्या आदेशानुसारच काम करत आली आणि या व्हायरसला जागतिक महामारी जाहीर करण्यात त्यांनी खूप उशीर केला' असा आरोपही माइक पॉम्पिओ यांनी केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
जगभर हाहाकार माजविणाऱ्या कोरोना विषाणूची निर्मिती चीनमधील प्रयोगशाळेत करण्यात आली होती, असा दावा करणारे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ हे अविवेकी गृहस्थ आहेत, अशी टीका चीनमधील सरकारी प्रसारमाध्यमांनी केली आहे. चीननेच हा विषाणू बनविल्याचा अमेरिकेचा दावा जागतिक आरोग्य संघटनेने याआधीच फेटाळून लावला आहे. चीनवरील आरोप सिद्ध करणारा कोणताही ठोस पुरावा अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटनेसमोर अद्याप सादर केलेला नाही, या गोष्टीकडेही चिनी सरकारी प्रसारमाध्यमांनी लक्ष वेधले आहे. पॉम्पिओ यांना फक्त विष पसरवायचे व खोटा प्रचार करायचा आहे, असे प्रत्युत्तर चीनमधील सरकारी वृत्तवाहिनीने दिले आहे.