कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाय केले जात आहेत. जगभरात कोरोनावर लस अथवा औषध शोधण्यासाठी युद्धपातळीवर संशोधन सुरू आहे. अनेक ठिकाणी चाचण्यांना देखील यश आले आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला असून लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान अमेरिकेतील मॉडर्ना (Moderna) कंपनीने कोरोना लसीसंदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. अमेरिकन औषधनिर्माण करणाऱ्या या कंपनीने गुरुवारी प्रेसनोट जारी केली आहे. यामध्ये लसीसंदर्भात एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. या निर्णयामुळे तर औषध कंपन्याना मोठा फायदा होऊ शकेल असं म्हटलं जात आहे.
मॉडर्ना कंपनी कोरोना व्हायरसच्या लसीच्या चाचणीवर काम करत आहे. तसेच चाचण्यांचा रिझल्ट देखील उत्तम येत आहे. कोरोना लसीचं पेटंट करण्यासाठी कंपनीकडून इतर कंपन्यांवर कोरोनाच्या काळात दबाव आणणार नाही असं कंपनीने आता म्हटलं आहे. आपल्या प्रेसनोटमध्ये याबाबतची माहिती दिली आहे. कोरोना साथीच्या काळात हा महामारीशी लढा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती दिली. जगभरात कोरोना लसीवर काम सुरू असून ठिकठिकाणी संशोधन करण्यात येत आहे. संशोधनातून सातत्याने महत्त्वाची माहिती समोर येत आहे.
नेमका काय आणि कसा होणार फायदा ?
कोरोना लसीचं पेटंट करण्यासाठी मॉडर्नाकडून इतर कंपन्यांवर कोरोनाच्या काळात दबाव आणणार नसल्याची महत्त्वाची माहिती कंपनीने दिली आहे. जगभरात अनेक ठिकाणी कोरोना लसीवर मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू आहे. त्या आता मॉडर्नाच्या पेटंट तंत्रज्ञानाचा वापर करू शकणार आहेत. कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करण्यासाठी, लवकरात लवकर कोरोना व्हायरस नष्ट करण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेतल्याची माहिती कंपनीने दिली आहे. कोरोना लस विकसित करताना येणाऱ्या अनेक अडचणी दूर करून त्यासाठी लागणारा कालावधी कमी करण्यासाठी ही घोषणा करण्यात आली आहे. यामुळे लस विकसित करणाऱ्या कंपन्यांना वेळेसहीत इतरही गोष्टींसाठी फायदा होणार आहे. लसीसाठी लागणारा बराचसा वेळ हा कमी होणार असून काही प्रकिया सोप्या होणार आहेत. सध्या कोरोनाच्या संकटात व्हायरसचा नाश करण्यासाठी mRNA तंत्रज्ञानाचा वापर केला जाणं हे अभिमानास्पद असल्याचं मॉर्डनाने म्हटलं आहे.
लसीमुळे वृद्धांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढत असल्याचं निरीक्षण
US नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अॅलर्जी अँड इन्फेक्टीव्ह डिसिसीज आणि अमेरिकन बायोटेक कंपनी मॉडर्ना यांनी मिळून कोरोनावर लस तयार केली आहे. ही लस सध्या पहिल्याच टप्प्यातील चाचणी करत आहे. या लसीमुळे वृद्धांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढत असल्याचं निरीक्षणात दिसून आलं आहे. 'न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन' मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालानुसार mRNA-1273 ही लस आतापर्यंत ज्या व्यक्तींना देण्यात आली त्या व्यक्तींवर या लसीचा खूप चांगला परिणाम दिसून आला आहे. एनआयएआयडी संशोधकांच्या मते, वृद्ध लोकांमध्ये कोरोनाचा धोका अधिक असतो आणि हा धोका नष्ट करणं, कमी करणं यासाठी ही लस महत्त्वपूर्ण आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबते वृत्त दिले आहे.
हिवाळ्यात कोरोना अधिक धोकादायक होणार?, तज्ज्ञांनी दिलं उत्तर
हिवाळ्यात कोरोनाचा धोका वाढणार असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र जागतिक आरोग्य संघटनेनेच याबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे. तापमानाचा कोरोनावर काय परिणाम होतो याबाबत जगभरातील तज्ज्ञ आपलं मत मांडत आहेत. प्रामुख्याने हंगामी व्हायरस हे (Seasonal Virus) हिवाळ्याम्ध्ये सक्रिय होतात. जगभरातील अनेक भागांमध्ये हिवाळ्यामध्ये इन्फ्युएंझाचा प्रकोप वाढताना दिसतो. आतापर्यंत कोरोनाच्या ट्रेंडमध्ये काही विशेष फरक झालेला दिसत नाही.
फ्लू व्हायरसमुळे हिवाळ्यात सर्वाधिक मृत्यू
व्हायरसमुळे होणारे श्वसनयंत्रणेशी संबंधित आजार हे थंड तापमानात वाढतात. याच कारणामुळे फ्लू व्हायरसमुळे हिवाळ्यात सर्वाधिक मृत्यू होत असतात. त्यामुळेच कोरोनामुळे हिवाळ्यात अधिक लोकांचा मृत्यू होऊ शकतो अशी भीती अनेकांनी वर्तवली आहे. आतापर्यंत तापमानामुळे कोरोना व्हायरसच्या संसर्गात वाढ झाल्याचं स्पष्ट झालेलं नाही. भारतात एकूण सहा ऋतू असून हिवाळ्यात इन्फ्लुएंझाचा प्रकोप वाढताना दिसत नसून तो जून ते सप्टेंबर या काळात वाढतो असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.