इस्लामाबाद - संपूर्ण जगाला कोरोनाने विळखा घातला आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या 11 कोटींवर गेली आहे. तर लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान आता पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Pakistan PM Imran Khan) यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. इम्रान खान यांनी काही दिवसांपूर्वीच चीनची कोरोनाची लस टोचून घेतली होती. त्यानंतरही आता त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानमध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानने 12 देशांमधील प्रवाशांना एक महिन्यांसाठी प्रवेश बंदी जाहीर केली आहे.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे पाकिस्तानने हा निर्णय घेण्यात आला आहे. या देशात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांनाही हा आदेश लागू असणार आहे. प्रवेश बंदी केलेल्या देशांमध्ये दक्षिण आफ्रिका, रवांडा आणि टांझानियासह 12 देशांचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानमध्ये कोरोनाचा दक्षिण आफ्रिका स्ट्रेन आढळून आला होता. पाकिस्तानमध्ये कोरोनाचे दक्षिण आफ्रिका आणि ब्राझीलचे स्ट्रेन आढळल्यानंतर नागरी विमान प्राधिकरणाने देशांची सूची जारी केली असून ए, बी, सी अशी वर्गवारी केली आहे. सी गटातील 12 देशांवर पूर्णपणे बंदी घातली आहे. या 12 देशांवर 23 मार्च ते 5 एप्रिलपर्यंत प्रवास बंदी असणार आहे.
पाकिस्तानने बोत्सवाना, ब्राझील, कोलंबिया, कोमोरोस, घाना, केनिया, मोझाम्बिक, पेरू, रवांडा, दक्षिण आफ्रिका, टांझानिया आणि झांबिया आदी देशांना 'सी' गटात ठेवलं आहे. या देशांतील नागरिकांना पाकिस्तानमध्ये प्रवेश बंदी असणार आहे. कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचं प्राधिकरणाने म्हटंलं. पाकिस्तानने दिलेल्या माहितीनुसार, ए गटातील देशांमधून आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्यांना पाकिस्तानमध्ये दाखल होण्याआधी कोरोना चाचणी करणे आवश्यक नाही. या 'ए' गटात ऑस्ट्रेलिया, भूतान, चीन, फिजी, जपान, कझाकिस्तान, लाओस, मंगोलिया, मॉरिटानिया, मोरक्को, नेपाळ, न्यूझीलंड, सौदी अरेबिया, दक्षिण कोरिया, श्रीलंका, ताझिकीस्तान, व्हिएतनाम, त्रिनिदाद आणि टोबॅको आदी देशांचा समावेश आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान कोरोना पॉझिटिव्ह; दोन दिवसांपूर्वी घेतली होती चीनची लस
पाकिस्तानमध्ये कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. एकूण कोरोना रुग्णांची संख्या 6.26 लाखांहून अधिक झाली आहे. तर 13,843 जणांचा मृत्यू झाला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. पंतप्रधान इम्रान खान यांचे स्पेशल असिस्टंट फैजल सुल्तान यांनी ट्विट करून खान यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर इम्रान खान यांनी स्वत:ला आयसोलेटेड करून घेतलं असून संपर्कात आलेल्यांना कोरोनाची चाचणी करून घेण्याचे आवाहन देखील केलं आहे. पाकिस्तानमध्ये वेगाने कोरोनाचा प्रसार होत असतानाच इम्रान खान यांनी गुरुवारी चीनच्या कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता. त्यानंतर देखील ते कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.