कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. अनेक देशांमध्ये वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना व्हायरसची दुसरी लाट आली असून पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्यात आला आहे. जगभरातील कोरोना रुग्णांच्या संख्येने तब्बल चार कोटींचा टप्पा पार केला असून लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. याच दरम्यान एका देशाने मोठा निर्णय घेतला आहे. कोरोनाची लक्षणं असो वा नसो शहरातील सर्वांचीच आता कोरोना टेस्ट करण्यात येणार आहे. कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येनंतर ब्रिटनने मोठा निर्णय घेतला आहे.
लिव्हरपूलमध्ये सर्वच नागरिकांची कोरोना टेस्ट करण्यात येणार आहेत. व्यक्तींमध्ये कोरोनाची लक्षणे दिसत नसली तरी त्याची चाचणी होणार आहे. लिव्हरपूल शहरात सर्वांची चाचणी घेण्याचा निर्णय हा सध्या प्रायोगिक तत्वावर घेण्यात आला आहे. या प्रयोगात यश मिळाल्यास देशातील इतर ठिकाणीही सर्वांचीच चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. कोरोनाग्रस्तांची सातत्याने वाढणारी संख्या लक्षात घेऊन ब्रिटन सरकारने गुरुवारपासून एक महिन्यांसाठी लॉकडाऊन सुरू करण्याची घोषणा केली आहे.
लिव्हरपूलमध्ये सर्वांचीच चाचणी घेण्यात येणार
कोरोना टेस्ट दरम्यान लिव्हरपूल शहरात गोंधळ होऊ नये अथवा विरोध होऊ नये यासाठी लष्करालाही पाचारण करण्यात आले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने नवीन प्रयत्न सुरू केले आहेत. सध्या सुरू असलेली स्वॅब टेस्ट आणि न्यलॅट्रल फ्लोद्वारे लिव्हरपूलमधील नागरीक आणि कामगारांची टेस्ट करण्यात येणार आहे. या टेस्टचे निकाल एका तासात समोर येणार आहेत. लिव्हरपूलमध्ये सर्वांचीच चाचणी घेण्यात येणार असल्यामुळे त्यादृष्टीने सर्वच तयारी करण्यात येणार आहे. मोठ्या प्रमाणावर चाचणी कशी केली जावी आणि वेगवान पद्धतीने चाचणी कशी होईल हे देखील समजणार आहे.
"कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेता दोन हजार सशस्त्र जवान तैनात"
इतर शहरात चाचणी घेण्याचा निर्णय घेतल्यास त्याचा फायदा होणार आहे. संरक्षण मंत्री बेन वल्लास यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेता दोन हजार सशस्त्र जवान तैनात करण्यात येणार आहेत. लिव्हरपूलमधील नागरिकांच्या सोयीसाठी सर्व काळजी घेण्यात येणार आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस एडनॉम गेब्रियेसस यांनी स्वत:ला क्वारंटाईन करून घेतल्याची माहिती समोर आली आहे.
कोरोनाबाधिताच्या संपर्कात आल्याने WHO प्रमुखांनी स्वत:ला केलं क्वारंटाईन
कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने मी सेल्फ क्वारंटाईन केलं आहे अशी माहिती त्यांनी ट्विटरवरून दिली आहे. "मी एका कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याचे दिसून आले आहे. सध्या मी पूर्णपणे स्वस्थ आहे व माझ्यामध्ये कोणतीही लक्षणं नाहीत. मात्र जागतिक आरोग्य संघटनेच्या नियमांप्रमाणे मी पुढील काही दिवसांसाठी सेल्फ क्वारंटाईनमध्ये असणार आहे व घरूनच काम करणार आहे" असं टेड्रोस यांनी म्हटलं आहे. जगभरात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत.