नवी दिल्ली : कोरोना व्हायरसने जवळपास संपूर्ण जागतच धुमाकूळ घातला आहे. सर्वत्र कोरोनावरील लस अथवा औषध तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, असे असतानाच संयुक्त अरब अमीरातने (यूएई) दावा केला आहे, की त्यांच्या एका रिसर्च सेंटरने उपचाराची आणखी एक पद्धत शोधून काढली आहे. विशेष म्हणजे या पद्धतीमुळे कोरोना व्हायरसवर मात केली जाऊ शकते, असेही यूएईने म्हटले आहे.
यूएईच्या परराष्ट्र मंत्रालयातील स्ट्रॅटेजिक कम्यूनिकेशन्स विभागाच्या डायरेक्टर हेंड अल कतीबा यांनी हा दावा केला आहे. या नव्या पद्धतीने 73 कोरोनाबाधित बरे झाले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
हेंड अल कतीबा यांनी एक ट्विट करून म्हटले आहे, की अबू धाबी स्टेम सेल सेंटरने कोरोनावरील एक नवी उपचार पद्धती विकसित केली आहे. ही उपचार पद्धती कोरोनाशी लढण्यात एक अभूतपूर्व पाऊल सिद्ध होऊ शकते. आजारी व्यक्तीच्या रक्तातून स्टेम सेस्ल काढणे आणि त्या पुन्हा सक्रीय करून संबंधित व्यक्तीच्या फुफ्फुसात सोडणे, हा या नव्या उपचार पद्धतीचा भाग आहे. याने पेशींना पुनर्जीवित केले जाते. यामुळे फुफ्फुसाची क्षमता पुन्हा वाढते.
कतीबा यांचे म्हणणे आहे, की या उपचार पद्धतीचे आणखी प्रयोग सुरू आहेत. येणाऱ्या काही आठवड्यांत, याचा अधिक चांगल्या प्रकारे उपचार शक्य आहे, का हे आम्हाला समजू शकेल. ही उपचार पद्धती आपल्याला कोरोनाचा सामना करण्यास फार चांगल्या प्रकारे मदत करेल.