'ओमायक्रॉन' या कोरोना व्हायरसच्या नव्या व्हेरिएंटने जगभरात दहशत निर्माण केली आहे. तज्ज्ञांनी हा व्हायरस डेल्टा पेक्षाही अधिक धोकादायक असल्याचं म्हटलं आहे, कारण हे आतापर्यंतचं सर्वाधिक म्यूटेटेड व्हर्जन असल्याचं निदर्शनास आलं आहे. यात डेल्टा व्हेरिएंटच्या तुलनेत अधिक म्यूटेशन आढळून आले आहे. यामुळेच, या स्वरूपाची पहिली काही प्रकरणे समोर येताच जागतिक आरोग्य संघटनेने याला व्हेरिएंट ऑफ कंसर्न असल्याचं सांगितलं होतं. कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने शास्त्रज्ञांची चिंता वाढवली आहे. याच दरम्यान ओमायक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेऊन ब्रिटिश सरकार अलर्ट झालं आहे.
वर्क फ्रॉम होम, वॅक्सीन पास आणि फेस मास्क अत्यंत महत्त्वाचं असल्याचं म्हणत ओमायक्रॉनच्या संकटात ब्रिटनने Plan B लागू केला आहे. रुग्णांची संख्या वाढल्याने ब्रिटनमध्ये कठोर उपाययोजना जाहीर करण्यात आल्या आहेत. पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी शक्य असेल तेथे घरातून काम करणं, सार्वजनिक ठिकाणी मास्क लावणं तसेच कुठल्याही ठिकाणी जाण्यासाठी लसीकरण प्रमाणपत्राचा वापर यांसारख्या अधिक कठोर उपाययोजना जाहीर केल्या आहेत. ब्रिटनमध्ये कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. त्यामुळेच आता ओमायक्रॉनच्या संसर्गाचा वेग कमी करण्यासाठी पावलं उचलण्यात येत आहेत.
देशात लस बूस्टर कार्यक्रम सुरू
बोरिस जॉन्सन यांनी दिलेल्या माहितीनुसार, ओमायक्रॉन हा अत्यंत वेगाने पसरत आहे आणि 'प्लॅन बी' लागू करण्याशिवाय दुसरा कोणता पर्याय नव्हता. देशात लस बूस्टर कार्यक्रम सुरू आहे. मात्र, आता लागू केलेले निर्बंध गेल्या वर्षी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनपेक्षा पूर्णपणे वेगळे आहेत. नवीन निर्बंध खूप कडक असल्याचे सांगण्यात आले आहे, कारण शहरातील मध्यवर्ती रेस्टॉरंट्स, कॅफे आणि दुकाने ख्रिसमसच्या काळात चांगले पैसे कमावतील आणि त्यांचा व्यवसाय वाढवण्याच्या आशेवर बसले आहेत. नवीन निर्बंधांबद्दल जॉन्सन यांच्या पक्षाचे काही लोक त्यांच्यावर नाराज आहेत. नव्या निर्बंधांचा आर्थिक परिणाम होण्याची त्यांना भीती आहे.
ब्रिटनमध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंटचे 568 रुग्ण
चित्रपटगृहे यांसह सार्वजनिक मास्क वापरण्यासारख्या कायदेशीर तरतुदी आम्ही लागू करू. घरून काम करण्याबाबतची मार्गदर्शक तत्त्वे देखील आम्ही पुन्हा लागू करू. तुम्हाला शक्य असेल तर घरून काम करा आणि आवश्यक असेल तर कामावर जा, पण शक्यतो घरूनच काम करा, असे आवाहन जॉन्सन यांनी केले. तसेच नाइट क्लब आणि गर्दीच्या ठिकाणी एनएचएस कोरोना पास अनिवार्य करण्याचेही जॉन्सन यांनी जाहीर केले. ब्रिटनमध्ये आतापर्यंत कोरोना व्हायरसच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचे 568 रुग्ण आढळून आले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.