वॉशिंग्टन : कोरोना साथीचा मोठ्या प्रमाणावर फैलाव झालेल्या ठिकाणी तोंडावर मास्क घातल्याने हजारो जण या विषाणूची बाधा होण्यापासून वाचले असे एका पाहणीत आढळून आले आहे. त्यामुळे या आजाराविरोधातील लढाईत मास्क हे एक प्रमुख साधन आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.त्यासंदर्भात अमेरिकेतील नॅशनल अॅकॅडमी आॅफ सायन्सेसच्या प्रकाशनामध्ये एक लेख प्रसिद्ध झाला आहे. त्यात म्हटले आहे की, फिजिकल डिस्टन्सिंग पाळून किंवा घरीच थांबल्यामुळे कोरोनाच्या संसगार्चा धोका नक्कीच टाळता येतो. मात्र मास्क घालणे हा देखील अत्यंत प्रभावी उपाय आहे. इटली व न्यूयॉर्कमध्ये मास्क घालणे बंधनकारक केल्यानंतर तिथे कोरोना साथीच्या फैलावामध्ये घट झालेली दिसून आली.न्यूयॉर्कमध्ये मास्क घालणे सक्तीचे केल्यानंतर कोरोनाचा संसर्ग होण्याच्या दररोजच्या प्रमाणात ३ टक्के घट झाली. इटलीमध्येही अशाच प्रकारे घट झाल्याचे आढळून आले. मास्क घालणे बंधनकारक करण्याआधी इटली, न्यूयॉर्कमध्ये फिजिकल डिस्टन्सिंग, क्वारंटाइन, सॅनिटायझिंग हे सारे उपाय करण्यात येत होते. मात्र मास्क घातल्याने जेवढा संसर्ग कमी झाला तो अन्य उपायांनी फारसा झाला नाही असे एका पाहणीत आढळून आले.मास्कच्या प्रचारासाठी कार्यक्रम आयोजित कराहवेतून विषाणूचा संसर्ग होण्याला मास्क मुळे अटकाव होतो. या मास्कनी हजारो लोकांचे प्राण वाचविले आहेत. मास्क वापरण्याचा प्रचार करणारे सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करावेत असे आवाहन यू. एस. सेंटर फॉर डिसिजेस कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन या संस्थेने शुक्रवारी तेथील जनतेला केले आहे. (वृत्तसंस्था)...तर भारतातही नियंत्रण मिळवणे शक्यपुणे : कोरोनापासून बचाव करण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायजर यांच्यापेक्षाही मास्कचा वापर करणे जास्त फायदेशीर ठरत आहे. लोकांनी योग्य मास्कचा वापर केला तर कोरोनाची लागण होण्याचा धोका फार कमी असतो असे अभ्यासातून पुढे आले आहे. भारताची मोठी लोकसंख्या पाहता येथील नागरिकांनी मास्कचा वापर केल्यास कोरोनाचा संसर्ग टाळण्यास मदत होणार आहे. लोकांनी गर्दीच्या ठिकाणी मास्क घालणे गरजेचे आहे. सर्वांनी मास्क घातल्यास कोरोनाचा संसर्ग टाळता येणे शक्य आहे. भारतात मास्कचा शंभर टक्के वापर झाल्यास कोरानावर नियंत्रण मिळवणे शक्य असून, नागरिकांनी मास्कचा वापर करावा, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.
CoronaVirus News: मास्कमुळे कोरोना संसर्ग टळला; वाचले अनेक नागरिकांचे प्राण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2020 3:50 AM