इस्लामाबाद – पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी पुन्हा एकदा देशात लॉकडाऊन करण्यास नकार देत हा निर्णय यशस्वी होणार नाही असं सांगितले. त्याचसोबत भारतात कोरोनाच्या भीतीने लॉकडाऊन करण्यात आलं त्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माफी मागितल्याचाही उल्लेख इमरान खान यांनी केला. इमरान खान यांनी पाकमधील नागरिकांना संबोधित करताना हे वक्तव्य केलं आहे.
‘डॉन’च्या वृत्तानुसार इमरान खान यांनी सांगितले की, जर आम्ही देशातील लोकांना जेवण उपलब्ध करु देऊ शकलो नाही तर लॉकडाऊन यशस्वी होऊ शकत नाही. भारताकडे पाहा, त्याठिकाणी लॉकडाऊन केल्यामुळे पंतप्रधान मोदींना माफी मागावी लागली असं ते म्हणाले. पण विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मन की बातमधून लॉकडाऊनमुळे लोकांना होणाऱ्या त्रासाबद्दल जनतेची माफी मागितली, त्याचसोबत कोरोनाच्या महामारीपासून वाचण्यासाठी लॉकडाऊन हा एकमेव पर्याय गरजेचा असल्याचं मोदींनी सांगितलं होतं.
पाकिस्तानमध्ये इमरान खान यांनी कोरोनाशी लढण्यासाठी पंतप्रधान सहाय्यता निधीची घोषणा करत लोकांनी मदत करण्याचं आवाहन केलं आहे. कोविड १९ च्या लढाईत पाकिस्तानची दोन शक्ती मजबूत आहे त्या म्हणजे विश्वास आणि युवा असं इमरान खान म्हणाले. प्रत्येक देश आपापल्या परिने कोरोनाविरुद्ध लढाई लढतोय. तसेच चीनचं कौतुक करताना पाकिस्तानने सांगितले की, कोरोनाच्या लढाईत सर्वात यशस्वी देश चीन राहिला आहे. कोरोनाचं केंद्र असलेल्या वुहानमध्ये लॉकडाऊन केल्यामुळे हा व्हायरस पसरण्यापासून रोखला गेला असं पाकिस्तान पंतप्रधान इमरान खान यांनी सांगितले.
दरम्यान, कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचा अमानुष चेहरा समोर आला. पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या लॉकडाऊन दरम्यान कराचीमध्ये प्रशासनाने हिंदूंना रेशन देण्यास नकार दिला आहे. कराचीच्या रेहड़ी घोथमध्ये हजारो गरीब लोक धान्य आणि दैनंदिन गोष्टींकडे पोहचले होते. मात्र, तेथे पोहोचल्यावर अनेक हिंदूंच्या वाट्याला निराशा आली. त्यांना सांगण्यात आले की, तुम्ही इथून जा, रेशन फक्त मुस्लिमांसाठी आहे. तेथील सिंध प्रशासनाने स्थानिक गरीब मजुरांना रेशन वाटप करण्याची व्यवस्था केली होती.