नवी दिल्ली - स्पेन, इटली आणि अमेरिका पाठोपाठ पाकिस्तानमध्ये देखील कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. पाकिस्तानने कोरोना रुग्णांच्या बाबतीत भारताला मागे टाकले असून येथे रुग्णांची संख्या १४०० वर पोहोचली आहे. तर संशयीतांचा आकडा १० हजारांच्या पुढे गेला आहे.
पाकिस्तानात पंजाब प्रांत कोविड-१९ च्या रुग्णांसाठी केंद्रस्थान म्हणून समोर आले आहे. या संदर्भात येथील आरोग्य सल्लागार जफर मिर्झा यांनी माहिती दिली. देशात सध्या कोरोना व्हायरस संशयीत रुग्णांची संख्या १२,२१८ एवढी असून यामध्ये १४०८ रुग्ण पॉझिटीव्ह आढळून आल्याचे जफर यांनी स्पष्ट केले. कोरोना बधित सर्वाधिक रुग्ण इराणहून परतलेले आहेत. इराणमध्ये आतापर्यंत ३० हजार रुग्ण आढळले असून २३०० लोकांचा मृत्यू झाला आहे.
बधितांमध्ये पंजाबमधून ४९०, सिंधमधून ४५७, पख्तूनख्वामधून १८०, बलुचिस्तान १३३, गिलगित बाल्टीस्थान १०७ आणि इस्लामाबादमधून ३९ रुग्ण आहेत. तर पाकव्यप्त काश्मीरमध्ये २ रुग्ण आढळले आहेत. पाकिस्तानात आतापर्यंत ११ लोकांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. तर २५ रुग्ण बरे झाले आहेत. कोरोना बधित रुग्ण पंजाबमध्ये झपाट्याने वाढले असून पंजाब कोरोना रुग्णांचे केंद्र बनले आहे. दरम्यान पाकिस्तानमधील स्थितीची समीक्षा करण्यासाठी चीनमधील डॉक्टरांचे पथक येणार असल्याचे पंजाबचे मुख्यमंत्री उस्मान बुजदर यांनी सांगितले.