मॅसाच्युसेट्स : ‘कोविड-१९’मुळे लाखो लोकांनी जीव गमावला असतानाच दुसरीकडे अगदी नव्वदी पार केलेल्या जगातील अनेकांनी या भयंकर आजारावर मात केल्याची खूप उदाहरणे आहेत. मॅसाच्युसेट्स या अमेरिकेच्या पूर्वेकडील राज्यातील तब्बल १०३ वर्षांच्या आजींनीही या महामारीला पळवून लावण्याचा पराक्रम केला आहे.
अमेरिका हा जगातील सर्वाधिक बाधित देश, तर न्यूयॉर्क हे तेथील सर्वाधिक बाधित राज्य. याला लागूनच मॅसाच्युसेट्स हे राज्य आहे. येथील जेनी स्टेन्जा या १०३ वर्षीय आजी ‘कोविड-१९’ विनर ठरल्या आहेत. या आजारातून बऱ्या झाल्यानंतर आजीबार्इंनी हॉस्पिटलमध्येच आवडत्या बिअरचे घोट रिचवत जोरदार सेलिब्रेशन केले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे. (वृत्तसंस्था)मूळची पोलंडची रहिवासी असलेल्या आपल्या आजीचा संघर्ष सागताना शेली गन म्हणते, ‘‘३ आठवड्यांपूर्वी तिची टेस्ट पॉझिटिव्ह आली. ताप जास्त असल्याने तिला वेगळ्या वॉर्डात ठेवण्यात आले. आपल्याला नेमकं काय झालंय, हे आजीला कळत नव्हते. मात्र, नर्सिंग होमच्या स्टाफने तिला मायेने सांभाळले. एकवेळ तर तिची तब्येत खूप खालावली होती. तेव्हा सर्व काही संपले, असे आम्हाला वाटले. मात्र, चिवटपणे झुंज देत आजी या आजाराला पुरून उरली. पूर्णपणे बरी झाल्याचे जाहीर झाल्यावर नर्सिंग होमच्या स्टाफने आजीला तिची आवडती बिअर भेट दिली. अनेक दिवसांपासून तिने आपल्या आवडत्या बिअरची चव चाखली नव्हती. हॉस्पिटलमध्येच तिने बिअरचे घोट रिचवत केलेले सेलिब्रेशन आमच्यासाठी स्पेशल होते.’’