संयुक्त राष्ट्रे : कोरानाविरुद्धची लढाई जगातील सर्व देशांनी एकत्र येऊ नच लढावी लागेल. पण, अनेक देश तसे न करता आपापली धोरणे राबवित आहेत. तसे केल्यास या लढ्याला यश येणार नाही, असे स्पष्ट प्रतिपादन संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनिओ गुटेरस यांनी केले आहे. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, या लढ्यामध्ये देश केवळ आपल्यापुरतेच पाहू लागले, तर परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ शकेल, हे त्यांनी ओळखायला हवे.कोरोना संसर्गाची सुरुवात चीनमधून झाली. नंतर युरोप, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका असा फैलाव होत गेला आणि आफ्रिका व भारतात तो वाढत आहे. पण या संसर्गजन्य आजाराशी सामना कसा करायचा, याबाबत देशांमध्ये समन्वय वा संवाद अजिबात दिसत नाही, ही खेदाची बाब आहे.प्रत्येक देश आपापल्या ताकदीनिशी या आजाराचा सामना करीत असला, तरी सर्व राष्ट्रांमध्ये समन्वय, सुसंवाद आणि मदत करण्याची भावना असेल, तर कोरोनाविरुद्धच्या लढ्याला बळ मिळेल. हा आजार एका देशापुरता नसून, जगभरात पसरला असल्याने सामूहिकपणे अनेक गोष्टी करणे गरजेचे आहे, असे गुटेरस यांनी नमूद केले. ते म्हणाले की, कोरोनामुळे अनेक समस्या निर्माण होताना दिसत आहे. बेकारी वाढत आहे, आर्थिक संकटांचा सामना करावा लागणार आहे, हिंसाचाराच्या घटना वाढू लागल्या आहेत आणि अनेक देशांमध्ये मानवी अधिकारांचे सर्रास उल्लंघन होताना दिसत आहे. या आर्थिक, सामाजिक व राजकीय समस्या आहेत. आरोग्य समस्येइतक्याच त्याही महत्त्वाच्या असून, त्या सोडविण्यासाठी सर्वांनी एकत्रपणे काही निर्णय घ्यायला हवेत. (वृत्तसंस्था)>आपण निराश झालो आहोत...दुसऱ्या महायुद्धानंतर जगाला प्रथमच एखाद्या मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे, पण सध्याचे चित्र पाहून आपण निराश झालो आहोत, असे गुटेरस म्हणाले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा त्यांनी थेट उल्लेख केला नाही. पण जागतिक आरोग्य संघटनेस आर्थिक मदत न करण्याच्या त्यांच्या निर्णयाचा त्यांनी नाव न घेता संदर्भ दिला.
CoronaVirus News : कोरोनाच्या लढ्यात सर्व देशांनी एकत्र येणे आवश्यक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2020 3:16 AM