वॉशिंग्टन - कोरोना व्हायरसमुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे आहे. जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत असून कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी बहुतांश देशांत लॉकडाऊन सुरू आहे. असे असतानाही कोरोनामुळे मृतांचा आकडा वाढतच चालला आहे. अमेरिकेसह अनेक देशात या व्हायरसने कहर केला आहे. या देशांमधील मृतांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत चालला आहे. जगभरात कोरोनामुळे आतापर्यंत लाखो अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर रुग्णांची संख्या ही आठ कोटींच्या वर गेली आहे. याच दरम्यान अमेरिकेत कोरोनाचा विस्फोट झाला आहे.
महासत्ता असलेल्या अमेरिकेतही मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. अमेरिकेत कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. अमेरिकेत गेल्या 24 तासांमध्ये तब्बल 1.62 लाखांहून अधिक कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 2,07,86,001 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत तीन लाख 53 हजार जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनापुढे अमेरिकेसारखा मोठा देशही हतबल झाला आहे. जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्यावतीने जारी करण्यात आलेल्या आकेडवारीनुसार, गेल्या 24 तासांमध्ये एक लाख 62 हजार 423 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
अमेरिकेतील परिस्थिती दिवसेंदिवस कोरोनामुळे गंभीर होत चालली आहे. एकूण रुग्णांची संख्या दोन कोटी सात लाखांहून अधिक झाली आहे. तर गेल्या 24 तासांमध्ये 1,681 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क, टेक्सास आणि कॅलिफोर्निया प्रांतामध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा संसर्ग झाला आहे. अमेरिकेच्या कॅलिफोर्निया आणि कोलोराडोनंतर आता फ्लोरिडा प्रांततही कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने बाधित रुग्ण समोर आले आहेत. एवढेच नाही, तर रशियातही कोरोना बाधितांची संख्या वाढली आहे.
अमेरिका आणि फ्रान्समध्ये आढळले नव्या स्ट्रेनचे रुग्ण
अमेरिकेत कॅलिफोर्निया आणि कोलोराडोनंतर आता फ्लोरिडा प्रांतातही कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. या प्रांतातील मार्टिन काउंटीमध्ये 20 वर्षांच्या नव्या रुग्णाला या स्ट्रेनच्या कोरोनाची लागण झाली आहे. अमेरिकेलाच कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. येथे आतापर्यंत जवळपास दोन कोटी लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर तीन लाख 42 हजारहून अधिक लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे. यानंतर, फ्रान्समध्येही दक्षिण आफ्रिकेशीसंबंधित स्ट्रेनचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. संक्रमित व्यक्ती नुकताच आफ्रिकेतून परतला होता. तर तैवानमध्येही इंग्लंडमधील नव्या स्ट्रेनचे दोन रुग्ण आढळून आले आहे.
नवनिर्वाचित खासदाराला कोरोनामुळे गमवावा लागला जीव
अमेरिकेतील नवनिर्वाचित खासदाराला कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ल्यूक जोशुआ लेटलो असं रिपब्लिकन खासदाराचं नाव होतं. 18 डिसेंबरला त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र याच दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. ल्यूक जोशुआ लेटलो यांनी 18 डिसेंबरला आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली होती. उत्तर लुसियानातील रिचलँड पॅरिशमधील आपल्या घरात ते आयसोलेट झाले होते. पण 19 डिसेंबरला त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं. याच दरम्यान त्यांची तब्येत कोरोनामुळे आणखी गंभीर झाली. त्यानंतर 23 डिसेंबरला त्यांना श्रेवेपोर्टमधील एका रुग्णालयातील आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं. उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. 41 व्या वयात त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्यामागे त्यांची पत्नी जुलिया बरनहिल लेटलो आणि दोन लहान मुलं आहेत.