बीजिंग: कोरोनाचा प्रादुर्भाव वेगानं वाढत असल्यानं चीनसमोर मोठं संकट निर्माण झालं आहे. पुढील २ आठवडे चीनसाठी निर्णायक आहेत. या कालावधीत चीनला कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात अपयश आल्यास ड्रॅगनला भयंकर परिस्थितीचा सामना करावा लागेल. चीनच्या काही भागांत ओमायक्रॉननं धुमाकूळ घातला आहे. लोकांच्या चाचण्या करण्याचं आणि त्यांना क्वारंटिन करण्याचं आव्हान दिवसागणिक कठीण होऊ लागलं आहे.
जागतिक मापदंडानुसार चीनमधील कोरोनाचा संक्रमण दर कमी आहे. मात्र चीनचे कोविड प्रतिबंधात्मक नियम अतिशय कठोर आहेत. त्यामुळे कोरोनाचं संकट आव्हानात्मक होऊ लागलं आहे. पुढील काही आठवड्यांत परिस्थिती नियंत्रणात न आल्यास चीनला मोठ्या संकटाचा सामना करावा लागेल.
गेल्या १० आठवड्यांपासून चीनमधील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे अनेक शहरांत कठोर लॉकडाऊन लावण्याची गरज निर्माण झाली आहे. यामुळे आर्थिक अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता आहे. चीनच्या उत्तरेला असलेल्या जिलिन प्रांतात कोरोनाच्या नव्या लाटेचा सर्वाधिक प्रभाव दिसत आहे. पुढील दोन-तीन दिवसांत औषधं आणि उपकरणं कमी पडतील अशी अवस्था आहे.
चीन आपल्या झिरो कोविड धोरणाचं कठोरपणे पालन करतो. यामध्ये बाधितांना शोधून संक्रमण रोखण्यापर्यंतच्या पावलांचा समावेश आहे. यामागे आरोग्यासोबतच राजकीय कारणंदेखील आहेत. कोविडविरुद्धच्या युद्धात चीनमधलं सरकारचं बरंच काही पणाला लागलं आहे. चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांचा दुसरा कार्यकाळ याचवर्षी संपणार आहे. तिसरा कार्यकाळ सुरळीत सुरू व्हावा यासाठी कोरोनाला नियंत्रणात आणण्याचं आव्हान जिनपिंग यांच्यासमोर आहे.