चीनच्या शांघाईमध्ये सर्वसामान्यांचं जगणं कठीण झालं आहे. शांघाईमध्ये कोरोनाची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. इतर देशांच्या तुलनेत कोरोना संसर्गाची फारच कमी प्रकरणे समोर येत असली, तरी चिनी अधिकाऱ्यांनी एक प्रकारे शांघाईला रोखून धरलं आहे. अपार्टमेंटमधील लोकांची ये-जा थांबावी म्हणून अपार्टमेंटकडे जाणारा मुख्य रस्ताही सील करण्यात आला आहे. अपार्टमेंटमध्ये बंद असलेल्या लोकांना खाण्यापिण्याच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. नागरिकांना त्यांच्या घरात कैद केले आहे आणि कोरोनाचा संसर्ग शून्य करण्याचे धोरण स्वीकारण्यासाठी रस्त्यांवर बॅरिअर्स लावण्यात आले आहेत.
रिपोर्टनुसार, शांघाई शहरात कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि छोट्या रस्त्यावर आणि अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये प्रवेश रोखण्यासाठी स्वयंसेवक आणि सरकारी कर्मचाऱ्यांनी मेटल बॅरिअर्स लावले आहेत. या संदर्भात, चीनी मीडिया संस्था Caixin ने सांगितले की, पुडोंग येथील स्थानिक प्रशासनाने धातूचे पत्रे किंवा अडथळे लावले आहेत. त्यात म्हटले आहे की ज्या इमारतींमध्ये संसर्गाची प्रकरणे आढळली आहेत त्या इमारतींचे मुख्य प्रवेशद्वार सील करण्यात आले आहे आणि केवळ आरोग्य कर्मचार्यांनाच जाण्याची परवानगी आहे. रविवारी, चीनमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाची 21,796 नवीन प्रकरणे नोंदवली गेली, त्यापैकी बहुतेक शांघाईमधील आहेत आणि त्यांच्यात रोगाची लक्षणे नाहीत.
देशभरातील अनेक शहरे आणि प्रांतांनी व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी काही प्रकारचे लॉकडाउन लागू केले आहेत. शांघाईमध्ये अनेक दिवसांपासून लॉकडाऊन आहे. एका दिवसात कुटुंबातून फक्त एका व्यक्तीला जाण्याची परवानगी आहे. विनापरवाना कोणतेही वाहन रस्त्यावरून जाऊ दिले जात नाही. सोशल मीडियावर मूलभूत गोष्टींचा अभाव असल्याच्या तक्रारी लोक करत आहेत, लोक संताप व्यक्त करत आहेत. पण चिनी प्रशासनावर त्याचा काहीही परिणाम झालेला नाही. सर्वांना अपार्टमेंटमध्ये बंद करण्यात आले आहे.
एका व्हिडीओमध्ये असे दिसते की आरोग्य कर्मचारी अपार्टमेंटला घेराव घालत आहेत. अधिकारी म्हणतात की जोपर्यंत शांघाईमध्ये नवीन प्रकरणे येत राहतात, तोपर्यंत निर्बंधांमध्ये कोणतीही शिथिलता येणार नाही. क्वारंटाइन क्षेत्राबाहेर आढळून आलेला संसर्ग चिनी अधिकारी गांभीर्याने घेत आहेत आणि त्यासाठी संपूर्ण अपार्टमेंटला शिक्षा दिली जात आहे. रायटरच्या रिपोर्टनुसार, शनिवारी शांघाईमध्ये कोरोनामुळे 23 मृत्यू झाले आहेत. तर एक दिवस आधी शुक्रवारी 12 जणांचा मृत्यू झाला होता. शनिवारी, शांघाईमध्ये लक्षणे नसलेले 19657 नवीन रुग्ण आढळले, तर लक्षणे असलेल्या नवीन रुग्णांची संख्या 1401 आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.