बीजिंग: चीनच्या वुहानमधून कोरोना विषाणू जगभरात पसरला. २०१९ मध्ये वुहान शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर युरोप, अमेरिका, भारतात कोरोनाचा धुमाकूळ पाहायला मिळाला. मात्र इतर देशांच्या तुलनेत चीननं कोरोनाचा कहर लवकर नियंत्रणात आणला. त्यामुळे चीनबद्दल जगभरात संशयाचं वातावरण आहे. त्यातच आता चीनच्या वुहानमध्ये कोरोना संकट पुन्हा परतलं आहे.
वुहानमध्ये वर्षभरानंतर पहिल्यांदाच कोरोना रुग्णाची नोंद झाली आहे. त्यानंतर आता शहरातील सर्व लोकांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. शहरातील सर्व नागरिकांची कोरोना चाचणी करण्यासाठी अभियान राबवण्यात येणार असल्याची माहिती स्थानिक प्रशासकीय अधिकारी ली ताओ यांनी दिली. वुहान शहराची एकूण लोकसंख्या १ कोटीपेक्षा जास्त आहे.
२०१९ मध्ये वुहानमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. इथूनच कोरोनाचा विषाणू जगभरात पोहोचला. त्यानंतर २०२० च्या सुरुवातीच्या काही महिन्यांमध्ये प्रशासनानं पावलं उचलली आणि कोरोना नियंत्रणात आल्याची घोषणा केली. त्यानंतर वर्षभर वुहानमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नाही. मात्र आता वुहानमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.
वुहानमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर चीननं लॉकडाऊन केला होता. नागरिकांना त्यांच्या घरात कैद केलं होतं. वाहतूक बंद करण्यात आली होती. मोठ्या प्रमाणात चाचणी अभियान राबवण्यात आसं होतं. वुहानमध्ये अनेक महिने कोरोनाचं थैमान पाहायला मिळालं होतं.