चीनमध्ये कोरोना संसर्गाचे नवीन संकट उभे राहिले आहे. चीन सरकार व्हायरस रोखण्यासाठी कठोर पावले उचलत आहे. लॉकडाऊनमध्ये करोडो लोकांना कैद करणे असो किंवा काही प्रकरणे समोर आल्यानंतर काही पाळीव प्राण्यांना मारणे असो. चीनमध्ये कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी क्रूर नियम करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पाळीव प्राण्यांना मारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एका रिपोर्टनुसार, चिनी अधिकाऱ्यांनी कोरोना रुग्णांच्या पाळीव प्राण्यांना व्हायरस हॉटस्पॉटमध्ये मारण्याची योजना आखली होती, जी स्थानिक लोकांच्या संतापानंतर रद्द करण्यात आली आहे.
डेलीमेलने दिलेल्या वृत्तानुसार, लँगफँग शहराच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी अँसी जिल्ह्यातील नागरिकांच्या पाळीव प्राण्यांना मारण्याचे आदेश दिले ज्यांची कोरोना व्हायरसची चाचणी पॉझिटिव्ह आली केली. मात्र बुधवारी शहरातील नागरिकांनी विरोध केल्याने अधिकाऱ्यांना आपले आदेश मागे घेत कारवाई थांबवावी लागली. आदेश मागे घेण्यापूर्वी कोणत्या प्राण्याची हत्या करण्यात आली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. चायना न्यूज सर्व्हिसने बुधवारी सांगितले की स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 5 वाजता "प्राण्यांची हत्या" थांबविण्यात आली आहे. मानवाकडून कुत्रे आणि मांजरींसारख्या प्राण्यांमध्ये कोरोना संसर्ग पसरल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत.
प्राण्यांपासून मानवांमध्ये व्हायरस पसरल्याचे एकही प्रकरण नोंदवले गेले नाही. चिनी प्रशासनाच्या या आदेशावरून बीजिंग आपल्या 'झिरो कोविड पॉलिसी'बाबत किती गंभीर आहे हे दिसून येते. चीनच्या या धोरणाने महामारीच्या सुरुवातीपासूनच स्थानिक पातळीवर परिस्थिती नियंत्रणात ठेवली आहे. मग ते कडक लॉकडाऊन असो, बॉर्डर कंट्रोलचे नियम असो किंवा क्वारंटाइन असो. पण आता पुन्हा एकदा कोरोनाचा वेगाने प्रसार होत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
कोरोनाचा खात्मा करण्यासाठी चीनचा हायटेक जुगाड; Video पाहून व्हाल चकीत
चीन आता कोरोनाला गांभीर्याने घेत आहे आणि तिथे झिरो कोरोना केसेसचं काटेकोरपणे पालन केलं जात आहे. यासोबतच नवीन प्रकरणांमध्येही झपाट्याने वाढ होत आहे. कोरोना निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी सरकारने अनेक हायटेक जुगाड केले आहेत. शांघाईच्या रस्त्यांवर रोबोट दिसत आहेत. ते लोकांना घरीच राहण्याच्या सूचना देत आहेत, त्यासंबंधीत इतर घोषणा देत आहेत. एवढेच नाही तर त्यांच्या आयसोलेशन सेंटरचे व्हिडिओही समोर आले आहेत. एका व्हिडीओमध्ये शांघाईच्या रस्त्यावर चार पायांचा रोबोट चालताना दिसत आहे. तो लोकांना घरामध्ये राहण्याची सूचना करताना दिसतो. त्याच्यावर एक स्पीकर लावण्यात आला आहे. त्यामुळे आवाज ऐकू येत असून त्याच्यामार्फत घोषणा केल्या जात आहेत. कोरोनाची प्रकरणे जास्त वाढू नयेत आणि लॉकडाऊनचेही पालन व्हावे यासाठी या हायटेक तंत्राचा अवलंब केला जात आहे. .