संयुक्त राष्ट्रे : चीनमधून उगम पावलेली आणि संपूर्ण जगात पसरलेली कोरोना विषाणूची महासाथ नजीकच्या भविष्यात तरी संपुष्टात येण्याची चिन्हे नाहीत. कोरोना विषाणू दीर्घकाळ भूतलावर वास्तव्य करणार असून लसीकरणाबरोबरच आरोग्याची योग्य ती काळजी घेणे हेच तूर्तास आपल्या हाती आहे, असे प्रतिपादन जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) अध्यक्ष टेड्रोस घेब्रेस्युस यांनी केले आहे. येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत घेब्रेस्युस यांनी कोरोना महासाथीविषयी सविस्तर विवेचन केले. कोरोनाचे वास्तव्य दीर्घकाळपर्यंत राहणार असून त्यापासून बचाव करण्यासाठी योग्य खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. जगभरात आतापर्यंत ७८ कोटी लसी दिल्या गेल्या असून अजूनही ही महासाथ आटोक्यात आलेली नाही. नववर्षाच्या प्रारंभी जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांत सलग सहा आठवडे कोरोना फैलावाचा आलेख घसरणीला लागला होता. मात्र, आता सलग सात आठवडे कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. अनेक आशियाई तसेच मध्य पूर्वेकडील देशांमध्ये कोरोना झपाट्याने पसरत आहे. जगभरात लसीकरण मोहिमेने वेग घेतला असला तरी केवळ लस हाच या महासाथीवरील एकमेव उपाय आहे, असे नाही, असेही घेब्रेस्युस म्हणाले.
कोरोनातून बरे झालेल्यांवर या विषाणूचे दीर्घकालीन परिणाम संभवतात. काही लोकांमध्ये या आजाराविषयी बेफिकिरी दिसून येते. विशेष करून तरुणांमध्ये. आपल्याला हा आजार होणारच नाही, हा त्यांचा भ्रम आहे. त्यामुळे हा भ्रम दूर करण्याबरोबरच काळजी घेणे हेच इष्ट. - टेड्रोस घेब्रेस्युस, जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष