वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही तब्बल 17 कोटींवर पोहोचली असून लाखो लोकांना आपला जीव गमावावा लागत आहे. सर्वच देशात वेगाने लसीकरण सुरू आहे. याच दरम्यान इस्रायल आणि ब्रिटनमधून दिलासादायक माहिती समोर आली आहे. इस्रायलमध्ये जवळपास 80 टक्के वयस्करांचे लसीकरण झाले आहे. नागरिकांचे लसीकरण झाल्याने इस्रायलमध्ये हर्ड कम्युनिटी विकसित झाली असल्याचं म्हटलं जातं. तर, दुसरीकडे ब्रिटनमध्येही लसीकरणाचे फायदे होत असल्याचे दिसून आले आहेत.
इस्रायलमध्ये दरदिवशी सरासरी 15 रुग्ण आढळत आहेत. एक वर्षानंतरची ही सर्वात कमी संख्या आहे. इस्रायलमध्ये मंगळवारी कोरोना निर्बंध पूर्णपणे हटवण्यात आले आहेत. आता नागरिकांना रेस्टॉरंट्स, चित्रपटगृहात जाण्यासाठी लस घेतल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार नाही. इस्रायलमध्ये याआधीच शाळा पूर्णपणे सुरू करण्यात आल्या आहेत. तर, मास्कचा वापर करण्याची सक्ती मागे घेण्यात आली आहे. इस्रायलमध्ये प्रवेश करताना काही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. इस्रायलमधील शेबा मेडिकल सेंटर या मोठ्या रुग्णालयाचे उपमहासंचालक डॉ. इयाल जिमलिचमान यांनी सध्याच्या स्ट्रेनच्या संदर्भात इस्रायलमध्ये कोरोना शेवट झाला असून आम्ही हर्ड इम्युनिटीचा टप्पा गाठला असल्याचं म्हटलं आहे.
इस्रायलमध्ये सर्व शासकीय निर्बंध हटवण्यात आल्यानंतर आता ग्रीन पासपोर्टसाठीचे नियमही संपुष्टात आले आहे. आगामी काही दिवसांमध्ये सार्वजनिक संस्था, आस्थापने ही लसीकरण केलेल्यांसाठी आणि लसीकरण न केलेल्यांसाठीही सुरू राहणार आहेत. अनेक ठिकाणी प्रवेश करण्यासाठी आता लसीकरण केल्याचे प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यकता भासणार नाही. हर्ड इम्युनिटीचा टप्पा गाठण्यासाठी 70 ते 85 टक्के लोकांचे लसीकरण करणे आवश्यक आहे. इस्रायलमध्ये आतापर्यंत 60 टक्के लोकसंख्येचे लसीकरण झाले आहे. यामध्ये 80 टक्के वयस्कर नागरिकांची संख्या आहे. ब्रिटनमध्ये मंगळवारी करोनाच्या संसर्गामुळे झालेल्या मृतांची संख्या शून्य नोंदवण्यात आली. जवळपास 10 महिन्यानंतर एकाही कोरोना मृत्यूची नोंद झाली नाही.
ब्रिटनमध्ये कोरोना लसीकरण वेगाने सुरू आहे. ब्रिटनमध्ये करोना लसीकरणामुळे मागील वर्षीच्या तुलनेत करोनामुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या आणि मृतांच्या संख्येत घट झाली आहे. जगभरात 17 कोटींहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. जगातील सर्वाधिक कोरोनाबाधित देश अमेरिका आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. भारतातही गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 2,83,07,832 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1,32,788 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 3,207 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 3,35,102 लोकांना जीव गमवावा लागला आहे.