चीनने पुन्हा एकदा जगाचं टेन्शन वाढवलं आहे. कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. चीनमधील सर्वात मोठं शहर असलेल्या शांघाईमध्ये कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चीन आता कोरोनाला गांभीर्याने घेत आहे आणि तिथे झिरो कोरोना केसेसचं काटेकोरपणे पालन केलं जात आहे. यासोबतच नवीन प्रकरणांमध्येही झपाट्याने वाढ होत आहे. कोरोना निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी सरकारने अनेक हायटेक जुगाड केले आहेत. शांघाईच्या रस्त्यांवर रोबोट दिसत आहेत. ते लोकांना घरीच राहण्याच्या सूचना देत आहेत, त्यासंबंधीत इतर घोषणा देत आहेत. एवढेच नाही तर त्यांच्या आयसोलेशन सेंटरचे व्हिडिओही समोर आले आहेत.
एका व्हिडीओमध्ये शांघाईच्या रस्त्यावर चार पायांचा रोबोट चालताना दिसत आहे. तो लोकांना घरामध्ये राहण्याची सूचना करताना दिसतो. त्याच्यावर एक स्पीकर लावण्यात आला आहे. त्यामुळे आवाज ऐकू येत असून त्याच्यामार्फत घोषणा केल्या जात आहेत. कोरोनाची प्रकरणे जास्त वाढू नयेत आणि लॉकडाऊनचेही पालन व्हावे यासाठी या हायटेक तंत्राचा अवलंब केला जात आहे. शांघाईमध्ये 26 मिलियनहून अधिक लोक राहतात. लॉकडाऊनचे दोन टप्प्यात नियोजन करण्यात आले आहे.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शहरातील काही भागांमध्ये सोमवारपासून शुक्रवारपर्यंत लॉकडाऊन करण्यात येत आहे, असं शांघाईच्या स्थानिक प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. चीनच्या शांघाई शहरात लॉकडाऊन केल्यानंतर प्रशासनाने नागरिकांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे. लॉकडाऊन काळात विनाकारण घराबाहेर पडू नये, अन्न पदार्थ ऑनलाइन मागवावेत, शक्य असेल त्यांनी घरूनच काम करावं अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी चीननं याआधीच जगातील सर्वात कठोर 'झिरो कोविड पॉलिसी' लागू करण्याची घोषणा केली होती. तसंच चीनकडून सीमेवर कडक निर्बंध घालण्यात आले आहेत.
कोरोना संसर्ग वेगाने पसरू नये, यासाठी शांघाई शहरातील काही भागात सार्वजनिक वाहतूकही बंद ठेवण्यात आली आहे. 26 मिलियन लोकसंख्या असलेल्या शहरातील अनेक सेक्टर हे बंद करण्यात आले आहेत. जागोजागी बूथ तयार करण्यात आले असून कोरोना चाचण्या करण्यात येत आहेत. लॉकडाऊनमुळे शांघाईच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होत आहे. तसेच कोरोनामुळे शांघाईचं डिजनी थीम पार्क आधीपासूनच बंद आहे. शांघाईसह चीनच्या उत्तर पूर्वेत असेलल्या जिलिन प्रांतातही करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे की, 'कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी कठोर पाऊल उचलण्यात यावीत आणि आवश्यकता असेल त्या परिसरात ताबोडतोब लॉकडाऊन करावे.'