जिनिव्हा : सध्या संपूर्ण जगात हाहाकार माजविणाऱ्या कोरोना विषाणूचा उगम नेमका कोणत्या प्राण्यातून झाला, याचा शोध घेतला जावा आणि या विषाणूमुळे पसरलेल्या ‘कोविड-१९’ महामारीच्या संदर्भात जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) प्रतिसादाचे निष्पक्ष व सर्वंकष मूल्यमापन केले जावे, असा प्रस्ताव भारतासह ६२ देशांनी ‘वर्ल्ड हेल्थ अॅसेंब्ली’मध्ये मांडला आहे.‘वर्ल्ड हेल्थ अॅसेंब्ली’ ही ‘डब्ल्यूएचओ’ची धोरणात्मक निर्णय घेणारी सर्वोच्च संस्था आहे. भारतासह ३५ देश व २७ सदस्यांचा युरोपीय संघ यांनी मिळून हा नऊ पानी प्रस्ताव मांडला असून, अॅसेंब्लीमध्ये त्यावर (भारतीय प्रमाणवेळेनुसार) सोमवारी रात्रीचर्चा होऊन निर्णय घेतला जाणे अपेक्षित होते.या विषाणूच्या उगमावरून अमेरिका व चीन यांच्यात मध्यंतरी जोरदार जुंपली होती व ‘डब्ल्यूएचओ’ चीनला पाठीशी घालत असल्याचा आरोप करून, अमेरिकेने या जागतिक संस्थेला निधी देणेही बंद केले होते. आता हा प्रस्ताव मांडणाºया देशांमध्ये अमेरिका व चीन या दोन्ही देशांचा समावेश नाही. भारताने या ठरावासाठी पुढाकार घ्यावा, हे लक्षणीय आहे. कारण, भारताने आत्तापर्यंत या वादापासून अलिप्त राहणे पसंत केले होते व परस्परांवर आरोप करण्यापेक्षा आलेल्या संकटास एकदिलाने सामोरे जाणे अधिक महत्त्वाचे आहे अशी भूमिका घेतली होती. या महामारीची सुरुवात गेल्या डिसेंबरमध्ये चीनच्या वुहान प्रांतात झाली होती, हे स्वत: चीननेही नाकारलेले नाही; मात्र साथ तेथे सुरू झाली म्हणून विषाणूचा उगमही तेथूनच झाला, असे मानणे चुकीचे आहे असे चीनचे म्हणणे आहे. हा विषाणू एखाद्या प्राण्यातून माणसात संक्रमित झाला असावा असे मानले जाते. चीनमध्ये चित्र-विचित्र प्राणी मानवी अन्न म्हणून खाल्ले जातात व अशा प्राण्यांच्या अनियंत्रित बाजारांतून कदाचित हा विषाणू पसरला असावा असेही काहींना वाटते. (वृत्तसंस्था)सध्या चौैकशी नको : चीनजगभर कोरोनामुळे गंभीर परिस्थिती असल्याने आता जे संकट आपल्यासमोर आहे, त्या कोरोनाचा संसर्ग काही प्रमाणात कमी झाल्यावर याबाबत सविस्तर माहिती देण्यास आम्ही तयार आहोत. मात्र, सध्या याबाबत चौकशीची चर्चा नको, असे चीनने म्हटले आहे. तसेच सध्या कोरोनावर नियंत्रण मिळविण्याला आमचे प्राधान्य असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
CoronaVirus News : कोणत्या प्राण्यातून ‘कोरोना’चा उगम झाला, याचा शोध घ्यावा;‘डब्ल्यूएचओ’मध्ये भारतासह ६२ देशांचा प्रस्ताव
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 12:44 AM