जीनिव्हा : भौगोलिकदृष्ट्या मोठ्या आणि अधिक लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण खूप वाढत असल्याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेने चिंता व्यक्त केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. मायकेल रायन म्हणाले की अधिक लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत जाणे ही जगातील सर्वच देशांसाठी काळजीची बाब आहे.कोविड-१९ च्या चाचण्या अनेक देशांमध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. त्यातून मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळत आहेत. चाचण्यांमुळे कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे, असे या देशांचे म्हणणे आहे. मात्र त्यावर विश्वास ठेवणे शक्य नाही, असे सांगून डॉ. मायकेल रायन म्हणाले की, मुळात रुग्णांची संख्या वाढत चालली आहे, ही वस्तुस्थिती आहे. चाचण्यांमुळे ती कळत आहे, असे फार तर म्हणता येईल.चाचण्या केल्यामुळे रुग्ण आढळणे शक्य होत आहे. अन्यथा ते समजण्यात अडचणी आल्या असत्या. पण प्रत्यक्षात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा जगभर झपाट्याने वाढत चालला आहे, असेच डॉ. रायन यांच्या म्हणण्याचा अर्थ आहे.अनेक देशांमधील परिस्थिती अतिशय चिंताजनक म्हणावी अशी आहे. अमेरिका, दक्षिण आशिया, लॅटिन अमेरिका, आफ्रिका आणि मध्य पूर्वेकडील देशांमध्ये कोरोनाचावेगाने फैलाव होताना दिसत आहे, असेही डॉ. मायकेल रायन यांनी बोलून दाखविले. (वृत्तसंस्था)
CoronaVirus News : मोठ्या देशांमध्ये वाढणारा कोरोनाचा फैलाव चिंताजनक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 4:00 AM