जिनिव्हा : मलेरिया व अन्य आजारांवर देण्यात येणारे हायड्रोक्लोरोक्विन कोरोना रुग्णांवरील उपचारांमध्ये सध्या कोणीही वापरू नये, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. हे औषध कोरोनाला प्रतिबंध करण्यास किती प्रभावी आहे याविषयी सध्या माणसांवर प्रयोग सुरू आहेत. तेवढ्यापुरताच हायड्रोक्लोरोक्विनचा वापर मर्यादित ठेवावा, असेही या संघटनेने म्हटले आहे.यासंदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला जागतिक आरोग्य संघटनेतील आपत्कालीन वैद्यकीय योजना या विभागाचे कार्यकारी संचालक डॉ. मायकेल रयान यांनी सांगितले की, हायड्रोक्लोरोक्विन हे औषध मलेरिया व अन्य काही आजारांवर दिले जाते. पण कोरोनाच्या संसर्गावर ते किती परिणामकारक आहे हे प्रयोगांनंतर कळणार आहे. त्यामुळे या औषधाचा वापर करू नये. कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून हायड्रोक्लोरोक्विन हे औषध घेत असल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले होते. हे औषध कोरोनावर परिणामकारक नसल्याचा दावा अमेरिकेतील काही वैद्यकीय तज्ज्ञांनी केला. मात्र आपल्या वक्तव्यावरून सुरू झालेले वाद निरर्थक असल्याचे ट्रम्प म्हणाले होते.
CoronaVirus News : हायड्रोक्लोरोक्विनचा वापर कोरोनावरील उपचारांत नको
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2020 1:43 AM