वॉशिंग्टन : कोरोना विषाणूचा संपूर्णपणे नायनाट करणे तसेच त्याच्या संसर्गापासून जगाची कायमची सुटका होणे शक्य दिसत नाही, असे अमेरिकेतील मिनेसोटा विद्यापीठातील सेंटर फॉर इन्फेक्शियस डिसिज रिसर्च अँड पॉलिसी या संस्थेचे संचालक व संसर्गजन्य रोगांचे तज्ज्ञ मायकेल ऑस्टरहोल्म यांनी सांगितले.
चीनमधील वुहान शहरातून सुरुवात झालेल्या कोरोना साथीने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. या साथीमुळे अमेरिकेमध्ये सर्वाधिक रुग्ण व बळी गेले असून, त्यानंतर ब्राझील व भारताचा क्रमांक लागतो. कोरोना साथीमुळे जगातील अनेक देशांची अर्थव्यवस्थाही डळमळीत झाली आहे.
मायकेल ऑस्टरहोल्म म्हणाले की, कोरोना विषाणूच्या साथीवर नियंत्रण ठेवता येईल; पण हा विषाणू कधीही कायमचा नष्ट करता येणार नाही. एचआयव्ही विषाणूमुळे उद्भवणाऱ्या विकारावर औषधोपचार करता येतात; मात्र तो संपूर्ण नष्ट करणे शक्य झालेले नाही. त्यामुळे कोरोना विषाणूच्या संसर्गाला आपल्या आयुष्याचा एक भाग बनवून लोकांनी यापुढे जगायला शिकले पाहिजे.
कोरोना विषाणू संपूर्णपणे नष्ट करता येणे कठीण आहे, असे अमेरिकेतील आघाडीचे संसर्गजन्य रोगतज्ज्ञ डॉ. अँथनी फौसी यांनी सांगितले. दुसऱ्याच दिवशी मायकेल ऑस्टरहोल्म यांनी फौसी यांच्या मताचा पुनरुच्चार केला. ऑस्टरहोल्म यांनी सांगितले की, कोरोना विषाणूच्या संसर्गाचा फैलाव आता ज्या पद्धतीने वाढत आहे, ती परिस्थिती कदाचित पुढे कायम राहणार नाही, असे त्यांनी सांगितले.
भविष्यातही लसी बनविल्या जातील
संसर्गजन्य रोगांचे तज्ज्ञ मायकेल ऑस्टरहोल्म म्हणाले की, कोरोनावरील प्रतिबंधक लस येत्या काही महिन्यांमध्ये सर्वांसाठी उपलब्ध होईल. त्यानंतर याच आजारावर आणखी लसी बनविण्यासाठी प्रयोग सुरूच राहतील. कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आणखी काही लसी शोधल्या जातील.