जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. याच दरम्यान दक्षिण कोरियामध्ये पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. असं असताना आता एका डॉक्टरच्या विधानामुळे खळबळ उडाली आहे. नवा वाद निर्माण झाला आहे. दक्षिण कोरियाचे डॉक्टर मा सँग-ह्यूक यांनी ज्या व्यक्तीला अद्याप कोरोना झाला नाही, त्याचा अर्थ असा आहे की त्याचे कोणीही मित्र नाहीत असं म्हटलं आहे. डॉक्टरांनी फेसबुक पोस्ट 10 दिवसांपूर्वी लिहिली होती. पण आता त्याची जोरदार चर्चा रंगली आहे.
पोस्टवरून वाद वाढल्यानंतर आता त्यांनी ती डिलीट केली आहे. मी हे केवळ उदाहरण म्हणून बोललो होतो, मात्र त्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आल्याचे त्यांनी स्पष्टीकरणात म्हटलं आहे. 'इंडिपेंडंट'च्या वृत्तानुसार, कोरियन व्हॅक्सिन सोसायटीचे उपाध्यक्ष ह्यूक यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं होतं की, ज्या लोकांना अद्याप कोरोनाचा फटका बसलेला नाही, त्यांना स्वतः मध्ये मग्न होण्याच्या समस्येने ग्रासले आहे. यावरून ते समाजात उठत-बसत नाहीत आणि त्यांना मित्रही नाहीत, हे स्पष्ट होतं.
दक्षिण कोरियाच्या न्यूज साइटला दिलेल्या मुलाखतीत डॉक्टरांनी 'मी यावर जोर दिला की व्हायरस इतक्या वेगाने पसरत आहे की अशा वातावरणात त्यापासून वाचणे कोणालाही अशक्य आहे. तसेच, प्रत्येक क्षेत्रात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे असं म्हटलं आहे. ज्या दिवशी डॉ. ह्यूक यांनी हे विधान केले त्यादिवशी दक्षिण कोरियामध्ये कोरोनाचे 4 लाखांहून अधिक नवीन रुग्ण आढळले. देशात ओमायक्रॉन प्रकारामुळे कोरोना प्रकरणांमध्ये मोठी वाढ झाली आहे.
कोरोनाची आकडेवारी पाहता सध्या सरकार कोरोना निर्बंध शिथिल करण्याच्या मनस्थितीत नाही. यासोबतच लोकांना सोशल डिस्टन्सिंगची काळजी घेण्यास सांगण्यात येत आहे. आतापर्यंत, देशातील 52 मिलियन लोकसंख्येपैकी सुमारे 63 टक्के लोकांना बूस्टर डोस देण्यात आला आहे. तसेच, 86 टक्क्यांहून अधिक लोकसंख्येचे संपूर्ण लसीकरण झाले आहे. गेल्या वर्षीपासून देशात ओमायक्रॉनची 1.4 लाखांहून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. मात्र, 60 वर्षांखालील यापैकी एकाचाही मृत्यू झालेला नाही ही दिलासादायक बाब आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.