कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराने इंग्लंडमध्ये थैमान घातलं आहे. या नव्या प्रकाराचा संसर्ग अतिशय झपाट्यानं होत असल्यामुळे ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी 6 जानेवारीपासून लॉकडाऊन लागू केला आहे. मात्र दिवसेंदिवस कोरोनाचं संकट आणखी गंभीर होत आहे. त्यामुळे लंडनचे महापौर सादिक खान यांनी आता परिस्थिती पाहता Major Incident ची घोषणा केली आहे.
सादिक खान म्हणाले की, मी लंडनमध्ये Major Incident ची घोषणा करत आहे. कारण, कोरोनाच्या संकटानं आता धोक्याची परिसीमा गाठली आहे. लंडनमधील दर 30 नागरिकांमागे एका नागरिकाला कोरोनाची लागण झाली आहे. आपण, आताच तातडीनं पावलं उचलली नाहीत, तर आरोग्य यंत्रणांवरील ताण वाढून मृतांचा संख्या वाढेल, असं सादिक खान यांनी ट्विटरद्वारे सांगितले.
लंडनमध्ये कोरोना नियंत्रणाबाहेर जात असल्याची बाब खान यांनी मांडलेल्या आकडेवारीतून समोर येत आहे. जिथं मॅकेनिकल व्हेंटिलेटरवर असणाऱ्या रुग्णांची संख्या 42 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. तसेच लंडनमधील नागरिकांना आताच सतर्क केलं नाही, तर त्यांना आयुष्याशीच मोठी तडजोड करावी लागेल, असा इशारा देखील स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
Major Incident म्हणजे काय?-
Major Incident हा शब्द सहसा एखादी मोठी घडामोड किंवा एखादी अशी घडामोड जिचे गंभीर परिणाम दिसून येणं अपेक्षित आहे, असा होतो. तसेच Major Incident मध्ये सद्याची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी खास व्यवस्था आणि आखणी करावी लागते.
पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांची लॉकडाऊनची घोषणा-
कोरोनाचं संकट पाहता मार्चपर्यत लॉकडाऊन लागू करण्यात येत आहे. त्यामुळे अत्यावश्यक कारणं, वैद्यकिय कारणं, जीवनावश्यक वस्तूंची खरेदी आणि कौटुंबीक हिंसेतून मदत मागण्यासाठीच्या कारणांनीच घराबाहेर पडण्याची मुभा नागरिकांना असेल असं बोरिस जॉन्सन यांनी नमूद केलं. इंग्लंडमधील शाळा, माध्यमिक विद्यालयं, महाविद्यालयं यांच्यावरही या लॉकडाऊनचे थेट परिणाम होणार आहेत. तसेच खुल्या ठिकाणी होणाऱ्या क्रीडा प्रकारांवरही यादरम्यानं बंदी आणली गेली आहे.