लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील खासगी आणि अत्यंत महत्त्वाचा क्षण. तो संस्मरणीय व्हावा म्हणून प्रत्येक जण आपापल्या परीनं जे काही करता येईल ते करीत असतो. ‘लग्न आयुष्यात एकदाच होतं, त्यामुळे ते धूमधडाक्यात, लोकं आयुष्यभर नाव काढतील असंच झालं पाहिजे’ असं अनेकांचं मत असतं. बऱ्याचदा नियोजित वधू-वरांचाही त्यासाठी आग्रह असतो. त्यामुळेच भारतीय लग्नांत वऱ्हाडी, पाहुणे मंडळींच्या आगतस्वागतापासून ते एकामागून एक उठणाऱ्या पंगतींपर्यंत सर्व सरंजाम अगदी वाजतगाजत केला जातो. अनेकांना हा वायफळ खर्च वाटत असला तरी तो अत्यावश्यक आहे, या मतावर अनेक कुटुंबीय ठाम असतात. एका अभ्यासानुसार, जगभरात लग्नसमारंभांसाठी जेवढा खर्च केला जातो, तोच खर्च नव्या जोडप्यांच्या अत्यावश्यक गोष्टींसाठी केला, तर त्यांची आयुष्यभराची चिंता मिटू शकेल, पण होतं उलटं. लग्नासाठी अगदी गरीब घरातील लोकंही कर्ज काढायला आणि वाटेल तेवढा खर्च करायला मागेपुढे पाहात नाहीत. अर्थातच लग्नाच्या कर्जाच्या या बोजात ते आयुष्यभर अडकतात.कोरोनानं मात्र सगळ्यांचाच हिरमोड केला. लग्न वाजतगाजत आणि साग्रसंगीत होणं तर जाऊच द्या, पण जगभरात अनेक लग्नं कॅन्सल झाली. २०२० या वर्षात जगभरात सर्वाधिक लग्नं कॅन्सल झाली. पुढे ढकलली गेली. कोरोना जाईल, लॉकडाऊन उठेल, लोकांच्या एकत्र येण्यावरची बंधनं संपतील या आशेवर अनेकांनी आपल्या लग्नाच्या तारखा वारंवार पुढे ढकलल्या; पण तरीही काेरोनानं त्यांच्या लग्नांवर गंडांतर आणलंच. अर्थात यातून मार्ग काढताना काहींनी आपलं मन मारून पाच-पंचवीस माणसांच्या साक्षीनं लग्न केलं, ज्यांना तेही जमलं नाही, त्यांनी ऑनलाइन लग्नाचा मार्ग पत्करला. कोरोनाकाळात जगभरात सर्वाधिक लग्नं कॅन्सल झाली, त्याचप्रमाणे याच काळात सर्वाधिक ऑनलाइन लग्नंही झाली, तरीही लग्न होणाऱ्यांची संख्या मात्र कमीच होती. काहींनी आणखी एक मार्ग काढला. आता लग्न आणखी पुढे ढकलता येणार नाही आणि लग्नाचा ‘धूमधडाका’ही करता येणार नाही, हे लक्षात आल्यावर लग्न तेवढं थोडक्यात आटपून घेतलं आणि लग्नाचं रिसेप्शन मात्र सावकाशीनं, पण दणक्यातच करायचं ठरवलं.गेल्या वर्षी जगभरात लाखो लग्नं कॅन्सल झाली असली, तरी लग्नाचा बार यंदा म्हणजे २०२१ मध्ये काहीही झालं तरी उडवायचाच असं अनेकांनी ठरवलं आहे. भारत, चीन, इंग्लंड, जपान, ऑस्ट्रेलिया, जर्मनी... इत्यादी अनेक देशांत गेल्या वर्षी लाखो लग्नं एकतर टाळली गेली, पुढे ढकलली गेली किंवा रद्दच झाली. एकट्या अमेरिकेत गेल्या वर्षी नियोजित १० लाखांपेक्षा जास्त लग्नं होऊ शकली नाहीत. जगभरातली विवाह इंडस्ट्री त्यामुळे गोत्यात आली, पण ही भरपाई यंदा दुपटी-तिपटीनं होईल असा अंदाज आहे. अमेरिका आणि जगभरात यंदा लग्नांची संख्या जवळपास वीस ते पंचवीस टक्क्यांनी वाढेल असा निष्कर्ष यासंदर्भातील अभ्यासकांनी काढला आहे. विवाह इंडस्ट्रीचं झालेलं नुकसान त्यामुळे काही प्रमाणात भरून निघू शकेल.न्यू याॅर्कमधल्या पॉट दाम्पत्याचं लग्न सप्टेंबर २०२०मध्ये होणार होतं. सगळी तयारी झाली होती, दोनशे ते तीनशे पाहुणे गृहीत धरून सारा खर्च केला गेला होता, पण शेवटी वधू-वरासहित एकूण १३ जणांमध्येच त्यांना लग्न ‘उरकून’ घ्यावं लागलं.वेडिंग साइट ‘द नॉट’ने ‘आयबीआयएस’च्या जागतिक अहवालाचा हवाला देताना, गेल्या वर्षी टाळले गेलेले अनेक विवाह यंदा होतील, असं म्हटलं आहे. कारण अनेक जोडप्यांनी लग्नस्थळ आणि इतर गोष्टी अगोदरच रिझर्व करून ठेवल्या आहेत. त्यासाठी जास्त पैसेही त्यांनी मोजले आहेत.‘नॉट वर्ल्डवाइड’ या संस्थेच्या लॉरेन यांचं म्हणणं आहे, गेल्या वर्षी अमेरिकेत लाखो विवाह टाळले गेले असले तरी त्यातील ४७ टक्के म्हणजे किमान पाच लाख विवाह या वर्षी होतील. जुलै ते ऑक्टोबर हा लग्नसराईचा, धामधुमीचा काळ असेल. २०२२ मध्येही बरेच विवाह होतील. तज्ज्ञांच्या मते २०२१ हे वर्ष जगभरात ‘लग्नांचं वर्ष’ असेल. लग्नांचं रेकॉर्ड यंदा मोडलं जाईल! ‘सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल ॲण्ड प्रिव्हेन्शन’नं (सीडीसी) अमेरिकेत मास्क न घालायला परवानगी दिल्यानं तेथील जोडप्यांची आशा पुन्हा उंचावली आहे. अमेरिकेतील प्रसिद्ध विवाह सल्लागार लेंडिस बेजर म्हणतात, माझ्या अनेक क्लायण्ट्सचं लग्न किमान दोन ते तीन वेळा पुढे ढकललं गेलं आहे. पण, काहीही झालं तरी यंदा त्यांना लग्नाचा बार उडवायचाच आहे.. आता आणखी खर्चाची त्यांची ऐपत नाही.‘लस घेतलीय? - तरच लग्नाला या!’ ज्यांची लग्नं ठरली आहेत, त्यांनी कोरोनाच्या भीतीमुळे मोजक्या पाहुण्यांमध्येच लग्नाचा निर्णय घेतला आहे, पण त्याचबरोबर निमंत्रणपत्रिकेत ‘कोरोनाच्या दोन्ही लसी घेतलेल्या असतील त्यांनीच लग्नाला यावं!’ असंही स्पष्टपणे म्हटलं आहे. वेडिंग प्लॅनर्सच्या मते अनेक जोडपी सोशल मीडियावर लग्नाच्या ड्रेससह ‘वॅक्सिनेशन स्टेटस’ही शेअर करताहेत.
CoronaVirus News: यंदाच्या ‘लग्नसराई’त जगभर बँड-बाजा-बारात!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2021 5:34 AM