न्यूयॉर्क : कोरोनाच्या साथीने अमेरिकेत माजविलेला हाहाकार थांबण्याची चिन्हे नसून आता तेथे या आजाराच्या रुग्णांची एकूण संख्या ४० लाखांवर गेली आहे. या साथीचा मोठ्या प्रमाणावर होणारा फैलाव पाहता अमेरिकेत लॉकडाऊन लागू करावा, अशी मागणी आता विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी राजकीय नेत्यांकडे केली आहे.
जॉन हॉपकिन्स विद्यापीठातील सेंटर फॉर सिस्टिम्स सायन्स अँड इंजिनिअरिंग या संस्थेने म्हटले आहे की, शुक्रवारी अमेरिकेतील कोरोना बळींची संख्या १,४३,८३० वर जाऊन पोहोचली. या देशातील कॅलिफोर्नियाने कोरोना रुग्णांच्या संख्येबाबत न्यूयॉर्कवर मात केली आहे. कॅलिफोर्नियामध्ये आता ४,२१,८५७ कोरोना रुग्ण आहेत.
अमेरिकेत कोरोना रुग्णांची वाढणारी संख्या लक्षात घेता ट्रम्प सरकारने या साथीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आणखी प्रभावी पावले टाकली पाहिजेत, अशी मागणी त्या देशातल्या विविध क्षेत्रांतील १५० तज्ज्ञांनी केली आहे. त्यामध्ये शिक्षक, शास्त्रज्ञ, डॉक्टर, नर्स आदींचासमावेश आहे. या तज्ज्ञांनी अमेरिकेतील राजकीय पक्षांच्या नेत्यांना कोरोनाच्या स्थितीबाबत एक पत्र लिहिले आहे.
कोरोना साथीचा फैलाव असाच सुरू राहिला तर १ नोव्हेंबरपर्यंत आणखी २ लाख अमेरिकी नागरिक मरण पावण्याचा धोका आहे. अमेरिकेच्या काही राज्यांमध्ये सर्व प्रकारची दुकाने सुरू आहेत. तिथले बार, हॉटेलही खुली झाली आहेत. सर्व व्यवहार सुरळीत सुरू असल्याचे चित्र दिसत असले तरी कोरोना साथीची टांगती तलवार अजूनही प्रत्येक अमेरिकी नागरिकाच्या डोक्यावर आहे. नेमका त्याचाच अनेकांना विसर पडला आहे, असे विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांनी राजकीय नेत्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.