लंडन/नवी दिल्ली : जगातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना लस शोधण्याचे प्रयत्न जगभर सुरू आहेत. त्यात ऑक्सफर्ड विद्यापीठाने आघाडी घेतली आहे. ऑक्सफर्डने तयार केलेली लस सुरक्षित असल्याचे मानवी चाचण्यांमधून समोर आले आहे.
ही लस पूर्णपणे यशस्वी ठरल्यास त्याचा मोठा फायदा भारताला होईल. सेरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने या लसीच्या उत्पादनासाठी करार केला आहे. त्यामुळे या लसीचे उत्पादन भारतात होईल. त्यादृष्टीने आवश्यक लसीची मानवी चाचणी पुढच्या महिन्यात घेणार असल्याचे सेरमतर्फे सांगण्यात आले. या लसीची सध्या मानवी चाचणी सुरू आहे.
शेकडो जणांना ही लस टोचण्यात आली. त्याचे निष्कर्ष दिलासादायक असल्याची माहिती ब्रिटिश मेडिकल जर्नल लॅन्सेटने दिली. ऑक्सफर्डने तयार केलेल्या लसीला शरीरातल्या रोगप्रतिकार यंत्रणेकडून चांगला प्रतिसाद मिळत असून कोणतेही साईड इफेक्ट्स दिसले नसल्याचं लॅन्सेटने सांगितले.
सेरम इन्स्टिट्यूटची भूमिका महत्त्वाची
ऑक्सफोर्ड विद्यापीठ अस्ट्राझेनेकाच्या मदतीनं कोरोनाची लस तयार करण्याच्या प्रयत्नात आहे. इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या या लसीच्या उत्पादनात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. त्यासाठी सेरमला डीजीसीआयने परवानगी दिली आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाने तयार केलेल्या लसीची मानवी चाचणी सध्या सुरू आहे.
ही लस दुहेरी ढाल म्हणून काम करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. ऑक्सफर्डने निर्माण केलेली कोरोना रुग्णाच्या शरीरात अँटीबॉडीज आणि टी सेल्स तयार करेल. लसीमुळे शरीरात गेलेल्या अँटीबॉडीज काही महिन्यांत नष्ट होतील. मात्र टी सेल्स काही वर्षे कायम राहतील, असे प्राथमिक चाचण्यांमधून दिसून आले आहे.
लस सर्वांपर्यंत कधी?
ऑक्सफर्डनं कोरोनावरील लस शोधल्यास सेरम इन्स्टिट्यूटमध्ये तिचे उत्पादन सुरू करण्यात येईल. ही लस प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचेपर्यंत बराच कालावधी जाईल, असे सीईओ अदर पूनावाला यांनी म्हटले आहे. 'कोरोनावरील लसीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात करावेळ लागेल. त्यातही परवाना मिळालेली पहिली लस सर्वोत्तम असेलच असे नाही', असे पूनावाला म्हणाले आहेत.