लॉस एंजलिस : कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी फिजिकल डिस्टन्सिंग राखताना दोन व्यक्तींमध्ये किमान सहा फूट अंतर पाहिजे हा ठरविलेला नियम आता बदलण्याची वेळ येणार आहे. कोरोनाच्या विषाणूमुळे रुग्णापासून किमान २० फूट अंतरावर असलेल्या व्यक्तीलाही संसर्ग होऊ शकतो असे अमेरिकेत नुकत्याच केलेल्या संशोधनातून सिद्ध झाले आहे.
कॅलिफोर्निया विद्यापीठातील शास्त्रज्ञांचाही या संशोधन प्रकल्पात सहभाग होता. कफ, शिंकणे, श्वसन यांच्याद्वारे कोरोना विषाणूचा संसर्ग एका व्यक्तीकडून दुसऱ्याला होत असतो. अन्य हवामान स्थितीच्या तुलनेत दमट व थंड हवामानात कोरोना संसर्ग तिपटीने वाढतो. शिंकणे, कफ किंवा बोलण्याच्या क्रियेतूनही सुमारे ४० हजार शिंतोडे (ड्रॉपलेट्स) उडत असतात. त्यातून कोरोनाच्या विषाणूचा संसर्ग होत असतो. त्याचा फैलावाचा वेगही मोठा असतो.
हवामान कसे आहे, यावरही संसर्ग किती प्रमाणात होईल हे अवलंबून असते. श्वसन, कफ किंवा शिंकण्यातून जे शिंतोडे उडतात, त्याचा हवेतील उष्णतामानाशी कसा मेळ साधला जातो, तसेच विविध तापमानात ही क्रिया कशी होते, याचा अभ्यास या संशोधनात करण्यात आला. त्यावर आधारित लेख एका नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे. माणसाच्या श्वसन, कफ, शिंकण्यातून जे शिंतोडे उडतात, त्यातून जवळ असलेल्या व थोडे लांबवर असलेल्या व्यक्तींना विषाणूंचा संसर्ग होत असतो. (वृत्तसंस्था)
अमेरिकेतील संशोधकांनी म्हटले आहे की, कोरोना साथीचा हाहाकार उन्हाळ्यातही कमी होण्याची शक्यता दिसत नाही. सार्वजनिक ठिकाणी एअर कंडिशनिंग प्रणाली ज्या तापमानावर चालविली जाते, त्याने कोरोना विषाणूचा प्रसार वेगाने होण्यास मदतच होते. मात्र, तोंडाला मास्क लावल्यास या संसर्गाचा धोका कमी करता येतो. फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे हादेखील कोरोनाला रोखण्याचा प्रभावी उपाय आहे.