कोरोना महामारीमुळे चीनमधील जनजीवन विस्कळीत झालं आहे. देशाच्या अनेक भागातून संसर्गाची प्रकरणे सातत्याने समोर येत आहेत. प्रशासन सतर्क आहे. याच दरम्यान, चीनमधील सर्वात महत्त्वाचं शहर असलेल्या शांघाय येथून एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये लोक क्वारंटाईनच्या भीतीने स्टोरमधून बाहेर पळताना दिसत आहेत. हा व्हिडिओ शांघायमधील Ikea स्टोअरचा आहे. लोक इथे खरेदीसाठी आले होते. पण अचानक एक खरेदीदार कोरोना रुग्णाच्या अत्यंत जवळ असल्याची माहिती समोर आली आणि एकच गोंधळ उडाला.
शहराच्या आरोग्य अधिकार्यांनी कोरोना रुग्णाच्या संपर्कात असलेल्या त्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी स्टोअर बंद करण्याचे तातडीने आदेश जारी केले, त्यानंतर स्टोअरमध्ये एकच खळबळ उडाली. दुकान बंद करण्याचा आदेश येताच लोकांनी आयकेईए शोरूममधून पळ काढण्याचा प्रयत्न सुरू केला. अधिकाऱ्यांनी त्यांना रोखण्यासाठी मुख्य गेट बंद करण्याचा प्रयत्न केला असला तरी मोठ्या संख्येने लोक दुकानातून बाहेर येण्यासाठी सर्व प्रयत्न करत होते. आरडाओरडा करत होते.
एकीकडे मोठ्या संख्यने लोक गेटमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करताना दिसत होते, तर दुसरीकडे अधिकारी त्यांना रोखण्यासाठी दरवाजा बंद करताना व्हिडीओमध्ये दिसत आहेत, मात्र त्यांचा अपयश येत होतं. कारण लोकांची गर्दी एवढी होती की अधिकारी काही करू शकले नाहीत आणि बघता बघता सर्व लोक स्टोरमधून पळून गेले. या घटनेशी संबंधित एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. शांघायच्या लोकांना या वर्षाच्या सुरुवातीला दोन महिने कडक लॉकडाऊनचा सामना करावा लागला.
चीन सरकारने शून्य कोविड धोरणांतर्गत कोरोना प्रकरणांची वाढ रोखण्यासाठी शांघायमध्ये दोन महिन्यांच्या कडक लॉकडाऊनची घोषणा केली. शांघाय हेल्थ कमिशनचे डेप्युटी डायरेक्टर झाओ डंडन यांनी रविवारी सांगितले की Ikea स्टोअर तात्काळ बंद करण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे. कारण तिबेटमधील ल्हासा येथून एक मुलगा परतला होता, ज्याच्या संपर्कात आलेला एक जण शोरूममध्ये आला होता. त्याच व्यक्तीचा शोध घेण्यासाठी दुकान लगेचच बंद करण्याचे आदेश देण्यात आले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.