जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. अनेक प्रगत देश कोरोनापुढे हतबल झाले आहेत. रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने काही ठिकाणी पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. जगभरातील कोरोना रुग्णांच्या एकूण संख्येने तब्बल 18 कोटींचा टप्पा पार केला आहे, तर लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच दरम्यान डेल्टा व्हेरिएंटचा हाहाकार पाहायला मिळत आहे. ब्रिटनमध्ये गेल्या सात दिवसांमध्ये तब्बल 35 हजार रुग्णांची नोंद झाली आहे.
ब्रिटनमधील कोरोना रुग्णांची संख्या ही 1,11,157 वर पोहोचली आहे. अधिकाऱ्यांनी साप्ताहिक आकडेवारी जाहीर करत गेल्या आठवड्यात डेल्टा व्हेरिएंटबाधितांच्या संख्येत 46 टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती दिली आहे. ब्रिटनमध्ये डेल्टा व्हेरिएंटचा संसर्ग वेगाने होत आहे. पब्लिक हेल्थ इंग्लंडने दिलेल्या माहितीनुसार, एकूण बाधितांपैकी 42 जणांना डेल्टा प्लस या व्हेरिएंटची बाधा झाली आहे. काही भागांमध्ये याचा प्रसार होण्याची अधिक शक्यता आहे. पीएचईने ब्रिटनमध्ये कोरोना लसीकरणाचाही फायदा होत आहे. दोन्ही डोस घेतल्यामुळे कोरोनापासून बचाव होत आहे.
ब्रिटनच्या आरोग्य अधिकारी डॉ. जेनी हॅरीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, यशस्वीपणे पार पडत असलेल्या कोरोना लसीकरण मोहीमेमुळे बाधितांची संख्या आणि रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांच्या प्रमाणाचे संबंध तुटला जात आहे. तसेच लशीचे दोन डोस एका डोस एका डोसच्या तुलनेत अधिक प्रभावी ठरत आहेत. त्यामुळे नागरिकांनी दोन्ही डोस घेणे आवश्यक असून दुसऱ्या डोसची वेळ न चुकवण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. तसेच योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे.
कोरोनावर विविध ठिकाणी संशोधन सुरू असून रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. असाच एक प्रकार आता समोर आला आहे. सलग 10 महिने कोरोना पॉझिटिव्ह राहिलेल्या 72 वर्षांच्या आजोबांनी कोरोनावर मात केली आहे. ब्रिटनमधील एक 72 वर्षीय व्यक्ती सलग 10 महिने कोरोना पॉझिटिव्ह राहिली होती. कोरोना संसर्गाचं आतापर्यंतचं हे सर्वाधिक लांब प्रकरण मानलं जात आहे. संशोधकांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. इंग्लंडमधील ब्रिस्टल येथील सेवानिवृत्त ड्रायव्हिंग इन्स्ट्रक्टर डेव स्मिथ यांनी दिलेल्या माहितीनुसार, "माझी 43 वेळा कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. यात माला सात वेळा रुग्णालयात दाखल करावे लागले. मी माझ्या अंत्यसंस्काराची योजना देखील आखली होती. शेवटी हार मानून मी कुटूंबाला बोलावून सर्वांना निरोप दिला होता, गुडबाय म्हटलं होतं" अशी माहिती त्यांनी बीबीसी टीव्हीला दिली आहे.
अरे व्वा! तब्बल 10 महिने, 43 वेळा टेस्ट 'पॉझिटिव्ह' आलेल्या आजोबांनी जिंकली कोरोनाची लढाई
ब्रिस्टल अँड नॉर्थ ब्रिस्टल ट्रस्ट विद्यापीठाचे संसर्गजन्य रोग सल्लागार एड मोरन यांनी "स्मिथ यांच्या शरीरात संपूर्ण काळ कोरोना व्हायरस सक्रिय होता. अमेरिकन बायोटेक फर्म रेगेनरॉनने विकसित केलेल्या सिंथेटिक अँटीबॉडीजच्या कॉकटेलने उपचार केल्यावर स्मिथ बरे होऊ शकले. केस वेगळी असल्याने उपचार पद्धतीला परवानगी देण्यात आली होती. सध्या यूकेमध्ये ही पद्धत वैद्यकीयदृष्ट्या स्वीकारली जात नाही" असं म्हटलं आहे. मला माझे जीवन परत मिळाले आहे असं स्मिथ यांनी म्हटलं आहे. "रेगेनरॉनचे औषध घेतल्यानंतर 45 दिवसांनी आणि पहिल्यांदा पॉझिटिव्ह आल्याच्या 305 दिवसांनी त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला. त्यानंतर त्यांनी पत्नीबरोबर शॅम्पेनची बॉटल उघडून आनंद साजरा केला" असं स्मिथ यांनी म्हटलं आहे.