बीजिंग : ऑक्सफर्ड विद्यापीठ बनवत असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या मानवी चाचण्यांचे निष्कर्ष दिलासादायक यायला लागले. आता चीनची सिनोव्हॅक बायोटेक ही औषध कंपनी बनवत असलेल्या कोरोना लसीच्या मानवी चाचण्यांच्या तिसऱ्या टप्प्याला आता प्रारंभ झाला आहे. ब्राझिलमध्ये या चाचण्या होत आहेत.
सिनोव्हॅक कंपनीची कोरोनाव्हॅक लस मानवी चाचण्यांच्या तिसऱ्या टप्प्यात प्रवेश करणारी तिसरी लस ठरली आहे. या तिसऱ्या टप्प्यातील लसीचे पहिले डोस चाचण्यांत सहभागी झालेल्या स्वयंसेवकांना देण्यात आले. ब्राझिलमधील सहा राज्यांतल्या सुमारे ९ हजार स्वयंसेवकांना कोरोनाव्हॅक लस टोचली जाणार आहे. त्यानंतर पुढच्या तीन महिन्यांच्या कालावधीत त्यांच्यावर आणखी प्रयोग केले जातील.
मानवी चाचण्यांच्या या तिसऱ्या टप्प्याचे निष्कर्ष तीन महिन्यांनंतर हाती येण्याची शक्यता आहे. कोरोना साथीमुळे सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर ब्राझिल व तिसऱ्या स्थानी भारत आहे. ऑक्सफर्ड व अॅस्ट्राझेनेसा हे संयुक्तपणे विकसित करत असलेल्या कोरोना लसीच्या मानवी चाचणीचा तिसरा टप्पा ब्राझिलमध्येही पार पडणार आहे.
चीन सरकारची सिनोफार्म ही कंपनी विकसित करत असलेल्या लसीने देखील मानवी चाचण्यांच्या तिसऱ्या टप्प्यात प्रवेश केला आहे. जगभरातील काही कंपन्यांमध्ये कोरोनाची लस सर्वप्रथम कोण बनवितो, याची जगभरातील काही कंपन्यांमध्ये स्पर्धा लागली आहे. अमेरिकेतील फायझर, तसेच चीनमधील अजून एक कंपनी कॅन्सिनो देखील कोरोनावर लस बनविण्यासाठी प्रयोग करत आहेत.