चीनमधील वुहान शहरातील प्रयोगशाळेत कोरोनाच्या विषाणूची निर्मिती करण्यात आली व तेथील एका अपघाताने हा विषाणू वातावरणात मिसळला असा दावा अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. तसेच चीनमध्ये कोरोनाच्या साथीचा उद्भव कसा झाला व ती साथ जगभरात कशी पसरली याचा अमेरिका सखोल तपास करत आहे असल्याचे डोनल्ड ट्रम्प यांनी सांगितले होते. यानंतर आता चीनने धमक्या दिल्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना संर्दभातली माहिती लपवून ठेवल्याचा धक्कादायक आरोप अमेरिकेने केला आहे.
अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा म्हणजेच सीआयएने दावा केला आहे की, चीन आणि जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाची माहिती कशी लपवली आणि दोघांनी नक्की कोणत्या प्रकारची योजना आखली होती यासंर्दभातील सर्व पुरावे आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने जर कोरोनाची माहिती ताबडतोब जाहीर केली तर आम्ही कोरोना संक्रमणाच्या तपासणीत सामिल होणार नाही, अशी चीनने धमकी दिली होती. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाबाबत जगाला अलर्ट करण्यात उशिर केला असा आरोप अमेरिकेने केला आहे.
चीनमधून फैलावलेल्या कोरोनाच्या साथीने जगभर धुमाकूळ घातला असून, दोन लाखांहून अधिक लोक मरण पावले आहेत. प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. एखाद्याच्या चुकीमुळे जर अनेकांचा जीव जात असेल तर त्या कृत्याचा संबंधितांना जाब विचारायलाच हवा. पण जागतिक आरोग्य संघटनेने असे काहीही केले नाही. चीनच्या बाजूने बोलत राहाण्यात या संघटनेने धन्यता मानली असल्याचे सांगत डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेवर देखील नाराजी दर्शवली होती.
जगात कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. अमेरिकेत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 14 लाख 8 हजारांवर गेली आहे. जगात जवळपास एक तृतीयांश कोरोनाच्या केसेस अमेरिकेत आहे.तर एक चतुर्थांश मृत्यू एकट्या अमेरिकेत झाले आहेत. अमेरिकेत गेल्या 24 तासात 1630 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकुण कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णंची संख्या 83 हजार 425 वर पोहोचली आहे.