न्यूयॉर्क : कोरोनाची एकदा बाधा होऊन त्यातून बरे झाल्यानंतर, पुन्हा त्या विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता खूपच कमी आहे, असे अमेरिकेतील काही संसर्गजन्य रोगाच्या तज्ज्ञांनी म्हटले आहे. कोरोनातून बरे झालेल्या व्यक्तीला पुन्हा तोच आजार झाल्याच्या कहाण्या काही वेळेस ऐकायला मिळतात; पण पुन्हा हा आजार झाल्याचे ठोस पुरावे अद्याप मिळालेले नाहीत, असे या तज्ज्ञांनी म्हटले आहे.
कोरोना आजारातून एकदा बरे झाल्यानंतर, पुन्हा पुन्हा जर त्याची लागण होत राहिली तर आयुष्य बेसूर बनेल अशी भीती अमेरिकेतील नागरिकांना वाटत आहे. न्यूयॉर्कमध्ये कोरोनाच्या साथीने घातलेल्या थैमानामुळे शेकडो नागरिकांचे तिथे बळी गेले. आता तिथे कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण थोडे फार नियंत्रणात आले असले, तरी या आजाराची नागरिकांमध्ये असलेली दहशत अद्यापही कमी झालेली नाही. कोरोना संसर्गाची पुन्हा लागण होऊ शकते, असे मत संसर्गजन्य रोगाच्या तज्ज्ञांपैकी काही जणांचे आहे. या विषयांवर हे तज्ज्ञ काही प्रमाणात परस्परविरोधी विधाने करत असल्यामुळे अमेरिकेतील सामान्य नागरिकांचाही गोंधळ उडाला आहे.
हार्वर्ड विद्यापीठातील संसर्गजन्य रोगाचे तज्ज्ञ मार्क लिपसिच यांनी सांगितले की, कोरोना आजारातून एकदा बरे झाल्यानंतर त्याचा पुन्हा संसर्ग होण्याची शक्यता खूपच कमी असते. काही संसर्गजन्य रोगाच्या तज्ज्ञांनी सांगितले की, कोरोना साथीला सुरुवात होऊन फक्त सातच महिने झाले आहेत. मात्र, कोरोनाचा विषाणू आता इतर विषाणूंप्रमाणेच वागत आहे. कोरोना संसर्गावर प्रतिबंधक लस निघाल्यास त्याची फेरलागण होणेही कदाचित टाळता येऊ शकते. एकूण लोकसंख्येपैकी विशिष्ट टक्के लोकांना संसर्गजन्य रोगाची लागण झाली की सामूहिक रोगप्रतिकारशक्ती निर्माण होते. कोरोनाच्या साथीच्या बाबत अद्याप तशी स्थिती आलेली नाही.
रोगप्रतिकारशक्ती वाढवा
काही लोकांना कोरोना विषाणूचा कमी किंवा जास्त प्रमाणात संसर्ग होतो. संसर्ग झालेल्या व्यक्तीमध्ये असलेल्या प्रतिकारशक्तीनुसार हा आजार गंभीर स्वरूप धारण करतो किंवा करत नाही. त्यामुळे प्रत्येकाने आपली रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे संसर्गजन्य रोगाच्या तज्ज्ञांनी म्हटले आहे. अमेरिकेतील नागरिकांची रोगप्रतिकारशक्ती आशिया किंवा अन्य खंडातील नागरिकांपेक्षा कमी आहे, असेही म्हटले जाते; पण या विषयावर आणखी अभ्यास होणे गरजेचे आहे, असे संसर्गजन्य रोगाच्या तज्ज्ञांनी म्हटले आहे.