फ्लोरिडा : अमेरिकेत कोरोनाचे २५ लाखांहून अधिक रुग्ण असले आणि तिथे मरण पावलेल्यांची संख्या १ लाख २५ हजारांवर गेली असली तरी तेथील अनेक जण संसर्ग टाळण्यासाठीची काळजी घ्यायला मात्र तयार नाही. आम्ही मास्क घालणार नाही, अशी मोहीमच अनेकांनी हाती घेतली आहे.मास्क घेतल्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो आणि त्याचा शरीरावर प्रतिकूल परिणाम होतो, असे या मंडळींचे म्हणणे आहे. फ्लोरिडा प्रांताच्या पाम बीच कौंटी कमिटीच्या बैठकीत अनेकांनी मास्क न घालण्याचे जोरदार समर्थन केले. देवाने दिलेली सर्वोत्तम श्वासोच्छवासाची व्यवस्थाच मास्कद्वारे फेकून देण्याचा सरकार प्रयत्न करीत आहे. तो आम्ही हाणून पाडू, असे एका वृद्धने सांगितले.आमच्या श्वासोच्छवासाच्या प्रक्रियेवर व यंत्रणेवर अतिक्रमण करण्याचा अधिकार सरकारला नाही, असे मत एकाने व्यक्त केले. मास्क घालण्याची जबरदस्ती केल्यास अटक करण्यात यावी, अशी मागणीही काहींनी केली. एकाने तर बैठकीत आलेल्या डॉक्टरकडे हात करीत, ‘यांना अटक करा, हेच मास्क घाला, म्हणून सांगत फिरत आहेत’, अशी मागणी केली. (वृत्तसंस्था)>मास्क घालूनही संसर्गमास्क घालणारेही कोरोना विषाणूंच्या संसर्ग झाल्याने मरण पावले आहेत. मग मास्क घालायचाच कशाला, असा सवालही काही अमेरिकन मंडळी करताना दिसत आहेत, प्रत्यक्षात ज्यांनी मास्क वापरला, त्यांना संसर्ग झाल्याचे प्रमाण कमी असल्याचे आढळून आले आहे. मास्क न वापरणाऱ्यांना संसर्ग अधिक झाला आणि मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्येही मास्क न वापरणारेच अधिक होते, असे अमेरिकन प्रशासनाचे आणि वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
CoronaVirus News: आम्ही मास्कचा वापर करणारच नाही; अमेरिकेत मोहीम
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 4:04 AM