वॉशिंग्टनः गेल्या काही महिन्यांपासून कोरोनानं जगभरात धुमाकूळ घातला आहे. अनेक देशांनी कोरोनाला थोपवण्यासाठी लॉकडाऊनचा मार्ग स्वीकारलेला आहे. परंतु त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात येत असल्याची शक्यता धूसर वाटू लागली आहे. अमेरिकेला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. एका दिवसात अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये संसर्ग झालेल्यांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली आहे. त्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) प्रमुख टेड्रोस अधॅनम घेब्रेयेसस यांनी धोक्याचा इशारा दिला आहे. कोरोनाच्या संकटाची परिस्थिती आणखी धोकादायक बनत चालल्याचं त्यांनी सांगितलं आहे. ते म्हणाले की, आता काही काळापर्यंत पूर्वीसारखेच आयुष्य सामान्य होणार नाही. सोमवारी पत्रकार परिषदेत घेब्रेयेसस बोलत होते. ते म्हणाले, “नजीकच्या काळात पूर्वीसारखे दिवस आणि स्थिती सामान्य होणे कठीण आहे”. अनेक देश या साथीला रोखण्याचा प्रयत्न करत असून, अनेक देशांनी त्यावर नियंत्रणही मिळवण्याचं चित्र आहे. त्याच वेळी युरोप आणि आशियामधील अनेक देश चुकीच्या दिशेने जात आहेत. या दोन्ही खंडांत दिवसेंदिवस परिस्थिती भयानक होत चालली आहे. जगातील काही नेत्यांचे नाव न घेता ते म्हणाले की, काही लोक याकडे गांभीर्यानं पाहत नाहीत, परंतु साथीच्या रोगाचं संकट किती धोकादायक आहे, याची त्यांना कल्पना नाही. अमेरिकेतील दक्षिण आणि पश्चिमेकडच्या राज्यांमध्ये मृत्यूची संख्या सातत्याने वाढत आहे.ते पुढे म्हणाले की, या महारोगराईवर आपण विजय मिळवू शकतो, परंतु यासाठी आपण अत्यंत सावधगिरीनं पावलं टाकून सामाजिक अंतराच्या नियमांचं पालन केलं पाहिजे. त्यादरम्यान, डब्ल्यूएचओचे दोन तज्ज्ञ चीनमध्ये या साथीच्या रोगाचं मूळ शोधण्यासाठी गेले आहेत. मध्य चीनच्या वुहान शहरात प्रथमच हा विषाणू आढळला. पहिल्यांदा बीजिंग हा तपास करण्यासाठी परवानगी देण्यास तयार नव्हता, परंतु डब्ल्यूएचओविरोधात इतर देशांनी आक्रमक भूमिका घेत निषेध केल्यानंतर चीनला ते मान्य करावं लागलं. आता तपासणीनंतर सत्य उघड होईल.
हेही वाचा
अंबानींच्या RILनं रचला इतिहास; 12 लाख कोटींचं बाजार भांडवल जमवणारी देशातील पहिली कंपनी
बँक अन् पोस्टाला मिळाली जबरदस्त सुविधा; मोठी रक्कम काढल्यास मोजावे लागणार जास्त पैसे
धक्कादायक! प. बंगालमध्ये लटकलेल्या अवस्थेत सापडला भाजपा आमदाराचा मृतदेह
हो, मी पुढाकार घेईन; मोदी सरकारला 'टक्कर' देण्यासाठी पवारांचा पॉवरफुल प्लॅन