साऱ्या देशाला कोरोनानं विळखा घातला. त्यातून दहा हजार लोक दगावले.मात्र स्पेनमधल्या जहारा डे ला सिएरा या शहरातं मात्र एकाही व्यक्तीला कोरोनाची बाधा झाली नाही. सगळी माणसं सुरक्षित आहेत. साऱ्या स्पेनमध्ये हाहाकार असताना या शहराला असं सुरक्षित राहणं कसं जमलं?त्याचं उत्तर आहे, त्या शहरात 40 वर्षाचा महापौर. सॅण्टिगो गॅलवन. ज्यादिवशी स्पेनमध्ये ‘स्टेट ऑफ अलार्म’ अर्थात लॉकडाऊन जाहीर झालं. त्याक्षणी या तरुण महापौरानं आपल्या शहरात येणारे पाचही रस्ते बंद केले. दक्षिण स्पेनमधलं हे शहर. या शहराला मध्ययुगापासून लढायांचा, लढवय्यांचा मोठा वारसा आहे. त्याच वृत्तीनं इथली माणसं कोरोनाशी दोन हात करायला तयार झाली.पूर्ण शहर बंद झालं. रस्त्यावर कुठलंच वाहन उतरलं नाही. जे जर्मन आणि फ्रेंच टुरिस्ट होते, त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं. शहरात येणारी प्रत्येक गाडी र्निजतूक करुन, वेशीवरच माणसांची चाचणी करुन त्यांना आत सोडण्यात आलं. या शहरानं आपला बाकी जगाशी आणि स्पेनशीही असलेला सारा संपर्कच तोडून टाकला. आपण असा संपर्क तोडतोय त्यानं अडचणी येतील याची माहिती महापौरानं लोकांना दिली. मात्र 1400 लोकवस्तीचं हे शहर त्याच्यामागे उभं राहिलं.
आता रस्त्यावर माणसं नको म्हणून आवश्यक त्या वस्तू, किराणा घरपोच दिल्या जातात. कुणीच रस्त्यावर येत नाही. त्याचा परिणाम असा झाला की, या शहरात कुणीही बाधित नाही. आज सारे सुरक्षित आहेत, मात्र त्याचं श्रेय लोकांनाही की ते महापौरानं सांगितलं त्या क्षणापासून घरातच बसून आहेत. दोन आठवडे झाले, अजून त्यांचा संयम संपलेला नाही.