न्यूयॉर्क : कोरोना साथीमुळे अर्थव्यवस्था डळमळीत झालेल्या अमेरिकेमधील कामगारांपैकी अनेकांनी रोजगार गमावला आहे. त्यामुळे घरभाडे भरायलाही आमच्या खिशात पुरेसे पैसे नाहीत अशी व्यथा अमेरिकेतील कामगारांनी मांडली आहे. या स्थितीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कामगारांनी १मे रोजी कामगार दिनी न्यूयॉर्क शहरात निदर्शने केली.
अडचणीत आलेल्या कामगारांना सरकारने आर्थिक मदत करावी तसेच सध्या सर्व गोष्टींचे भाडे माफ करावे अशी मागणी कामगारांनी केली. न्यूयॉर्क शहरातील टाइम्स स्वेअर या प्रसिद्ध ठिकाणी आपापल्या कारमधून आलेले कामगार फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळून निदर्शने करत होते. कारचे हॉर्न वाजवून त्यांनी लोकांचे लक्ष वेधून घेतले. त्यातील पर्ला लिबेरातो या महिला कामगाराने हाती धरलेल्या फलकावर नो डॉलर, नो रेंट असे लिहिलेले होते. तिने सांगितले की, न्यूयॉर्क हे अमेरिकेतील कोरोना साथीचा केंद्रबिंदू आहे. कोरोनाची साथ पसरू नये म्हणून सर्व राज्यांत उद्योगधंदे बंद ठेवण्यात आले.
सार्वजनिक, खासगी वाहतूक सेवेवर निर्बंध लादले गेले. अत्यावश्यक सेवा वगळता बाकीचे सर्व व्यवहार बंद आहेत. या गोष्टींमुळे आर्थिक व्यवहार मंदावून अमेरिकेत असंख्य लोकांनी रोजगार गमावला आहे. त्यांची आर्थिक स्थिती नाजूक झाली आहे. आमच्याकडे जगायलाच पुरेसे पैसे नाहीत तर मग घरभाडे, वीज, पाणी आदींचे भाडे भरण्यासाठी आम्ही पैसे आणायचे कुठून असा सवाल न्यूयॉर्कमध्ये निदर्शने करणाऱ्या कामगारांनी केला. कोरोनामुळे लादलेले निर्बंध मागे घेईपर्यंत विविध गोष्टींचे भाडे सरकारने रद्द करावे अशी मागणी कामगारांनी केली आहे. कोरोेनाच्या साथीत न्यूयॉर्क शहरामध्ये आतापर्यंत सुमारे १३ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे.
बेकारी भत्त्यासाठी लाखो लोकांची नोंदणी
कोरोनाच्या संकटामुळे अमेरिकेतील बेकारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे लक्षावधी लोकांनी सरकारकडून बेकारी भत्ता मिळण्याकरिता आपल्या नावांची नोंदणी केली आहे.
अमेरिकेस सर्वोच्च प्राधान्य असे ज्यांच्या राजकारणाचे सूत्र आहे त्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कामगारवर्गाला दिलासा देण्यासाठी काहीही केले नाही असा आरोप न्यूयॉर्कमध्ये निदर्शने करणाऱ्या कामगारांनी केला आहे