वॉशिंग्टन - कोरोना विषाणूचा संसर्ग हे जागतिक संकट बनलेले आहे. जागतिक महाशक्ती असलेला अमेरिकेसारखा देशही या संकटासमोर हतबल झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, अमेरिकेतील एका ७० वर्षीय आजोबांनी तब्बल ६२ दिवस चाललेल्या लढाईनंतर कोरोनाला हरवले. तब्बल दोन महिने चाललेल्या या लढाईसाठी या आजोबांना हॉस्पिटलचे बील म्हणून जी रक्कम मोजावी लागली ते ऐकून तुमचे डोळे पांढरे झाल्याशिवाय राहणार नाही.
या ७० वर्षीय आजोबांना कोरोनावर यशस्वी इलाज करण्यासाठी १.१ मिलियन डॉलर म्हणजेच तब्बल ७.७ कोटी रुपये एवढी रक्कम मोजावी लागली. कोरोनावर मात केल्यानंतर या आजोबांनी ही रक्कम संबंधित रु्णालयाला अदा केली आहे. यासंदर्भातील वृत्त सिएटल टाइम्सने दिले आहे.
या वृत्तानुसार मिशेल फ्लोर या ७० वर्षीय आजोबांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले होते. त्यानंतर त्यांना उपचारांसाठी नॉर्थवेस्टर्न सिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे सुमारे ६२ दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. यादरम्यान, अशीही एक वेळ आली होती जेव्हा ते मृत्यूच्या दारात पोहोचले. त्यावेळी त्यांनी परिचारिकेच्या मदतीने पत्नी आणि मुलांना फोन करून अखेरचा निरोपही दिला होता.
मात्र ५ मे रोजी मिशेल यांनी कोरोनावर मात केली. त्यानंतर रुग्णायल प्रशासनाने त्यांना १८१ पानांचे आणि सुमारे ११ लाख २२ हजार ५०१.४ डॉलर एवढ्या रकमेचे लांबलचक बिल दिले. आयसीयू, स्टर्ली रूमचे बिल, २९ दिवस लावलेल्या व्हेंटिलेटरचे बिल यांचा समावेश आहे.
दरम्यान, मिशेल यांच्याकडे सरकारी इंशोरन्स प्रोग्रॅम असल्याने त्यांना हे बिल स्वत:च्या खिशातून रक्कम भरावी लागली नाही. याबाबत त्यांनी सांगितले की, माझा जीव वाचवण्यासाठी एक दशलक्ष डॉलर खर्च झाले. मात्र ही रक्कम योग्य प्रकारे खर्च झाली. मात्र असे करणारा मी एकमेव आहे, हेसुद्धा मला ठावूक आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग आणि लॉकडाऊनच्या माध्यमातून वाचवण्यासाठी अमेरिकी काँग्रेसने एक व्यापक योजना तयार केलेली आहे. त्यामध्ये कोरोनाच्या रुग्णांवरील इलाज करण्यासाठी रुग्णालये आणि खासगी विमा कंपन्यांना भरपाई देण्यासाठी १०० दशलक्ष डॉलरची मदत करण्यात आलेली आहे.