लंडन – दक्षिण आफ्रिकेतून पसरलेल्या कोरोनाच्या ओमायक्रॉन(Omicron) व्हेरिएंटनं जगातील सर्व देशांची चिंता वाढवली आहे. सर्वात आधी हा व्हेरिएंट दक्षिण आफ्रिकेत आढळला त्यानंतर जगातील ९१ देशांमध्ये हा पसरला आहे. भारतातही १३ राज्यांमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहे. या रुग्णांची संख्या १०० च्यावर पोहचली असून दिवसेंदिवस ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या रुग्णांमध्ये भर पडत आहे.
भारतात कोरोनाची दुसरी लाट पसरवण्यासाठी जबाबदार असलेल्या डेल्टा व्हेरिएंटच्या तुलनेने ओमायक्रॉन व्हेरिएंट अधिक वेगाने संक्रमित करत असल्याने चिंता वाढली आहे. त्याचवेळी यूकेमध्ये करण्यात आलेल्या एका स्टडीवरुन ओमायक्रॉनबाबत नवा खुलासा समोर आला आहे. ओमायक्रॉन व्हेरिएंट वेगाने संक्रमित होत असून त्याच्या लक्षणांबाबत अधिक माहिती समोर आली नाही. त्यामुळे या व्हेरिएंटचे रुग्ण लक्षणांच्या आधारे ओळखणं कठीण होत आहे.
ब्रिटनमध्ये केलेल्या एका स्टडीनुसार ओमायक्रॉनची काही लक्षणं आढळल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यात ओमायक्रॉन संक्रमित रुग्णांच्या नाकातून पाणी येणे, डोकेदुखी, थकवा, गळा सुकणे, यासारख्या लक्षणांचा समावेश आहे. त्यामुळे ओमायक्रॉनच्या लक्षणांत सामान्य सर्दीचाही समावेश होतो.
दुर्लक्ष केल्यास पडेल भारी
ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या लक्षणांबाबत नवा खुलासा लोकांची चिंता वाढवणारा आहे. कारण ही सगळी लक्षणं सामान्य सर्दीत दिसून येतात. त्यामुळे ओमायक्रॉन असूनही लोकं सामान्य सर्दी समजून त्याकडे दुर्लक्ष करतात. तसेच नकळत इतरांना ओमायक्रॉनचं संक्रमण पसरवतात. त्यामुळे असे लोक कोरोना संक्रमिताच्या संपर्कात आले किंवा गर्दीच्या ठिकाणी गेल्यास तिथे कोरोना संक्रमण होण्याचा धोका आहे. त्यामुळे सामान्य सर्दी असली तरी डॉक्टरांना दाखवा. गांभीर्याने घ्या आणि कोविड नियमांचे तंतोतंत पालन करा असंही तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.
कोरोना लस घेतलेल्या ९०% भारतीयांना ओमायक्रॉन संसर्गाचा धोका
भारतात लसीकरण झालेल्या लोकांपैकी तब्बल ९०% लोकांना देखील ओमायक्रॉनच्या संसर्गाचा धोका असल्याची माहिती आता समोर आली आहे. रिसर्चमधून याबाबत मोठा खुलासा करण्यात आला आहे. ओमायक्रॉनचा संसर्ग रोखण्यासाठी वेगवेगळ्या देशांमध्ये वापरल्या जाणाऱ्या लसीच्या क्षमतेवर ब्रिटनमध्ये हा अभ्यास करण्यात आला आहे आणि त्यानुसार, केवळ फायझर आणि मॉडर्ना लस कोरोनाच्या या नवीन व्हेरिएंटचा संसर्ग रोखण्यास सक्षम आहेत. पण यासाठी या लसींचा बूस्टर डोस द्यावा लागेल असंही म्हटलं आहे.