जोहान्सबर्ग : नोव्हेंबर महिन्याच्या प्रारंभी दक्षिण आफ्रिकेतील गौटेंग प्रांतात एक निराळीच घटना घडली. कोरोना विषाणूतील स्पाईक प्रोटीन तयार करणारे जनुक चाचण्यांमध्ये सापडेनासे झाले. त्याचबरोबर थकवा व डोकेदुखीच्या तक्रारी घेऊन अनेक रुग्ण डॉक्टरांकडे येऊ लागले. त्यामुळे शास्त्रज्ञांनी अधिक सखोल संशोधन करून ओमायक्रॉन हा नवा विषाणू शोधून काढला व त्याच्या अस्तित्वाची माहिती २५ नोव्हेंबरला जागतिक आरोग्य संघटनेने साऱ्या जगाला दिली.दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग, प्रिटोरिया येथे डेल्टा विषाणूने जुलै महिन्यात हाहाकार माजविला होता. त्यानंतर अनेक आठवडे तिथे कोरोना साथ काही प्रमाणात निवळली होती. मात्र तिथेही ओमायक्रॉनचे अस्तित्व आढळून आल्याने घबराट निर्माण झाली. हे भय नंतर साऱ्या जगात पसरले. सध्या दक्षिण आफ्रिकेत ओमायक्रॉनच्या संसर्गाने हातपाय पसरले आहेत. ब्रिटन, अमेरिकेसहित अनेक देशांनी दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांना प्रवेशबंदी केली आहे.
बोत्सवाना, हाँगकाँगमध्येही घबराटनोव्हेंबरच्या प्रारंभी बोत्सवाना देशातही एका नमुन्यामध्ये कोरोना विषाणूतील स्पाईक प्रोटीन निर्माण करणारे जनुक सापडत नव्हते. दक्षिण आफ्रिकेहून हाँगकाँगला आलेल्या एका नागरिकातील विषाणू नमुन्यातही हाच प्रकार आढळला होता. त्या रुग्णाचे लगेच विलगीकरण करण्यात आले. त्यामुळे त्या देशातही घबराट पसरली. तिथेही ओमायक्राॅनचे अस्तित्व आढळले.