ज्या चीनमधून कोरोना व्हायरस पसरला, त्याच चिनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक बघायला मिळत आहे. चीनमधील एका विद्यापीठात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने तेथील तब्बल 1,500 हून अधिक विद्यार्थ्यांना हॉटेलमध्ये आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.
वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, चीनच्या दालियान प्रांतातील उत्तर-पश्चिम शहरात असलेल्या झुनगाझे विद्यापीठात रविवारी कोरोनाचे डझनावर रुग्ण समोर आले. यानंतर विद्यापीठ परिसर सील करण्यात आला असून, विद्यार्थ्यांना हॉटेलमध्ये देखरेखीत ठेवण्यात आले आहे. ते तेथून ऑनलाइन क्लासेस अटेंड करतील. त्यांना त्यांच्या रूममध्येच जेवण दिले जात आहे.
कोरोनासंदर्भात चीन झिरो टॉलरेन्स धोरण अवलंबत आहे. जेथे कुठे कोरोनाचे रुग्ण आढळतील, तेथे ताबडतोब लॉकडाऊन लागू करण्यात येत आहे. क्वारंटाइन, चाचणी आणि प्रवासावरील निर्बंध आता तेथील बहुतांश लोकांसाठी सामान्य झाले आहे. चीनमध्येही कोरोनाविरोधातील लसीकरण मोहीम वेगाने सुरू आहे. जगात लसीचे सर्वाधिक डोस चीनमध्येच दिले गेले असल्याचा दावा केला जात आहे. आता तेथे बूस्टर डोस देण्याची तयारीही सुरू आहे.
चीनमध्ये गेल्या वर्षीच कोरोना जवळपास आटोक्यात आला होता. मात्र आता येथील अनेक भागांत संसर्गाची प्रकरणे वाढतच चालली आहेत. चीनमध्ये आतापर्यंत कोरोनाचे 98,315 रुग्ण आढळले असून 4,636 जणांचा मृत्यू झाला आहे. चीनच्या नॅशनल हेल्थ मिशननुसार, गेल्या 24 तासांत देशात 32 नवे रुग्ण आढळले आहेत, तर यांपैकी 25 रुग्ण एकट्या दालियानमध्ये आढळून आले आहेत. कोरोना संक्रमणाचा फैलाव रोखण्यासाठी चीनमध्ये विविध प्रकारचे निर्बंध लावले जात आहेत.