वॅनगार्ड : कोविड-१९ चा पहिला रुग्ण डिसेंबरमध्ये समोर आला असला, तरी त्याचा प्रसार सप्टेंबर २०१९ पासूनच सुरू झाला असल्याचा दावा केंब्रिज विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी केला आहे. प्रत्यक्ष बाधा होण्यापूर्वी काही महिने विषाणू शरीरात राहिला असून, त्याने स्वत:मधे परिवर्तन करून उपद्रव दाखविण्यास सुरुवात केल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. चीनमधील वुहान येथून रोगाचा प्रसार झाला आहे. मात्र, नक्की प्रसार कोठून झाला, वटवाघळातून त्याचा प्रवास कसा झाला, त्याचा पहिला बाधित व्यक्ती कोण? अशा विविध प्रश्नांवर शास्त्रज्ञ काम करीत आहेत. शास्त्रज्ञांनी बांधलेल्या आडाख्यानुसार १३ सप्टेंबर ते ७ डिसेंबर २०१९ या कालावधीमध्ये या विषाणूची मानवाला लागण झाली. केंब्रिज विद्यापीठाचे पीटर फोर्स्टर म्हणाले, ‘सध्याचा विषाणू हा सुप्तपणे मानवामधे काही महिने वास होता. त्याने आपल्यात बदल केल्यानंतरच त्याचे सध्याचे घातक रुप समोर आले आहे.’ शास्त्रज्ञांनी कोरोना विषाणूचे परिवर्तन आणि त्याच्या प्रसाराचा गणितीय सूत्रावर आधारित जागतिक नकाशा केला आहे. त्या माध्यमातून विषाणूमधे जनुकीय परिवर्तन कसे झाले, त्याचे उगमस्थान कोणते (पेशंट झीरो) होते याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. सध्या हा विषाणू वटवाघळातून आल्याचे मानले जात आहे. चीनच्या युनान प्रांतामधे वटवाघळाच्या विष्ठेच्या नमुन्यामध्ये हे विषाणू आढळून आले आहेत. त्याच्याशी आत्ताच्या विषाणूचा ९६ टक्के जनुकीय आराखडा जुळत आहे.
CoronaVirus: विषाणूचा प्रसार सप्टेंबरपासून; शास्त्रज्ञांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 2:22 AM