इस्लामाबाद : पाकिस्तानच्या पंजाब, सिंध, बलुचिस्तान, गिलगिट-बाल्टिस्तान, पाकव्याप्त काश्मीर, खैबर बख्तुनवा तसेच राजधानीचे शहर असलेल्या इस्लामाबादमध्ये ‘कोविड-१९’च्या रुग्णांमध्ये सतत वाढ होत असून, त्यामुळे पाकिस्तानी जनताच घाबरून गेली आहे, तर इम्रान खान सरकार हतबल झाल्याचे दिसत आहे.पाकिस्तानात महागाईने कहर केला आहे. अन्नधान्य, भाज्या यांचे भाव आकाशाला भिडले आहेत आणि त्यामुळे लोक आधीच संतापले आहेत. त्यामुळे इम्रान खान सरकार पूर्ण अपयशी ठरल्याची भावना देशात दिसत आहे. त्यातच रुग्णसंख्या वेगाने वाढत असून, त्या प्रमाणात तिथे वैद्यकीय सुविधा मात्र उपलब्ध नाहीत. त्यामुळे सरकारवर सर्व स्तरांतून जोरदार टीका होत आहे. रुग्णांसाठी पुरेशी रुग्णालये नाहीत, जी आहेत तिथे खाटांची व्यवस्था नाही, जिथे खाटा आहेत, तिथे डॉक्टर्स, नर्सेस आणि अन्य आरोग्य कर्मचारी नाहीत. त्यामुळे रुग्णांचे हाल सुरू आहेत, अशी टीका विरोधी पक्ष इम्रान खान यांच्यावर करीत आहेत.गेल्या २४ तासांत पाकिस्तानच्या सर्व प्रांतांत मिळून ५ हजार २४८ नवे रुग्ण आढळले. भारताच्या तुलनेत पाकिस्तानातील रुग्णसंख्या आणि रोज त्यात होणारी वाढ कमी आहे, असा दावा सरकार करीत आहे. पण पाकिस्तानचा आकार, तेथील लोकसंख्या पाहता हा आकडा खूपच मोठा आहे, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तेथील एकूण रुग्णांची संख्या आता १ लाख ४४ हजारांवर गेली आहे. तिथे बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही भारतापेक्षा कमी आहे. भारतात बरे होणारे रुग्ण ५१ टक्के आहेत. पण पाकिस्तानात जेमतेम ४0 टक्के इतकेच आहे.चाचण्यांचे प्रमाणही कमीपाकिस्तानात कोरोनाच्या चाचण्यांचे प्रमाणही अतिशय कमी आहे. तिथे गेल्या २४ तासांत ३0 हजारांहून कमी चाचण्या झाल्या. भारतात चाचण्यांचे प्रमाण लाखांमध्ये आहे. चाचण्यांचे प्रमाण कमी असल्याने रुग्णांचा खरा आकडा समजण्यात अडचणी येत आहे. पंजाब आणि सिंध या दोन प्रांतांमध्ये रुग्णांची संख्या ५५ हजारांच्या आसपास आहे.
CoronaVirus News: पाकिस्तानमध्ये मोठा प्रादुर्भाव; सर्व प्रांतांत धोका वाढला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 3:07 AM