नवी दिल्ली : डिसेंबरअखेरीस चीनमध्ये सुरू झालेल्या कोरोना विषाणूच्या संसर्गाने आता जगभरात हाहाकार माजवला असून अमेरिका आणि युरोपीयन देशांमध्ये हा आजारा वेगाने पसरत चालला आहे. आतापर्यंत जगात ११ लाख, ६७ हजार जणांना कोरोनाची बाधा झाली असून त्यापैकी ६२ हजार, ६९१ जण मृत्युमुखी पडले आहेत.जगातील सुमारे २०० देशांंंमधील विविध रुग्णालयांमध्ये ८ लाख, ५० हजारांहून अधिक लोकांवर सध्या उपचार सुरू असून त्यातील ४० हजार जणांची प्रकृती चिंताजनक आहे. मात्र दिलासादायक बाब म्हणजे, ८ लाख, ११ हजार रुग्णांमध्ये कोरोनीची लक्षणे अतिशय सौम्य आहेत, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.
कोरोना विषाणूमुळे झालेल्या प्रादुर्भावाने अमेरिकेत कोरोनाचे सर्वाधिक म्हणजेच 3 लाखांहून रुग्ण असून चिंतेची बाब म्हणजे गेल्या २४ तासांत तिथे १३ हजारांहून अधिक लोकांना संसर्ग झाला आहे. अमेरिकेत आतापर्यंत ७ हजार,९०० जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे आणि त्यात ४५० जण गेल्या २४ तासांत मरण पावले आहेत. न्यूयॉर्क आणि परिसरात सर्वाधित रुग्ण आढळले आहेत. येथील बाधितांचा आकडा दररोज वाढत आहे.
अमेरिकेखालोखाल कोरोनाने ज्या देशांमध्ये धुमाकूळ घातला आहे त्यापैकी बहुतांश देश युरोपातील आहेत. आतापर्यंत इटलीमध्ये १४ हजार, ७०० तर स्पेनमध्ये ११ हजार, ८०० लोकांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. फ्रान्समध्ये (६,५००), ब्रिटन (४,३१५), इराण (३,५००), जर्मनी (१,३३०), नेदरलँड (१,६५०) तर बेल्जीयम (१,३००) असे मृत्यू झाले आहेत. चीनमध्ये मात्र गेल्या दोन दिवसांत कोरोनामुळे केवळ चारच जणांचा मृत्यू झाला असून तेथील आतापर्यंतच्या मृतांची संख्या १,३२६ एवढी झाली आहे.देशात सर्वाधिक रूग्ण २१ ते ४० वयोगटातीलनवी दिल्ली : देशातील कोरोना बाधितांमध्ये २१ ते ४० वर्षे वयोगटातील सर्वाधिक ४२ टक्के रूग्ण असल्याची आकडेवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केली आहे. प्रत्येकी १०० पैकी ४२ रूग्ण या वयोगटातील आहेत. सर्वात कमी धोका ० ते २० वर्षे वयोगटातील लोकांना आहे, असे आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी सांगितले. देशात सध्या २ हजार ९०२ रूग्ण आहेत. शुक्रवारी ६०१ रूग्णांची नोंद झाली. ४१ ते ६० वयोगटातील रूग्ण ३३ टक्के तर ६० पेक्षा जास्त वय असलेले रूग्ण १७ टक्के आहेत. मृत्यू झालेल्या सर्व रुग्णांना कोणता ना कोणता आजार होता. त्यात प्रामुख्याने मधुमेह, उच्च रक्तदाब, श्वसन विकार, किडनीशी संबधित आजार असल्याचे निष्पन्न झाले, असेही अगरवाल म्हणाले.
मरकजमधील बाधितांमध्ये वाढदिल्लीमध्ये झालेल्या धार्मिक संमेलनाला गेलेल्यांपैकी १०२३ जणांना कोरोना विषाणूंचा संसर्ग झाला आहे. देशातील कोरोना रुग्णांपैकी एक तृतीयांश जण तबलीगी जमातशी संबंधित आणि त्यांच्या संपर्कात आलेले आहेत आणि ते देशाच्या १७ राज्यांमध्ये आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली.