इस्लाबामादः चीनमध्ये कोरोना व्हायरसनं आतापर्यंत 269हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. प्रत्येक दिवशी हा मृत्यूचा आकडा वाढतच चालला आहे. भारतानंसुद्धा वुहानमध्ये अडकलेल्या 647 नागरिकांसाठी विशेष विमान पाठवून त्यांना परत आणलं. परंतु पाकिस्तानमधले हजारो विद्यार्थी वुहानमध्येच अडकून पडले आहेत. त्या विद्यार्थ्यांनी पाकिस्तान सरकारकडे मदत मागितली आहे. परंतु पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी त्यांना परत आणण्यास नकार दिला आहे. त्यानंतर सोशल मीडियावरून इम्रान खान यांच्यावर टीकेची झोड उडवली जात आहे.चीनकडून त्या विद्यार्थ्यांना चांगली वैद्यकीय सुविधा मिळत असल्याचा दावा पाकिस्ताननं केला आहे. पाकिस्तानातील त्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांनी इम्रान खान यांच्यावर त्यांना परत आणण्यासाठी दबाव वाढवला आहे. परंतु सरकार त्यांचं ऐकण्यात तयार नाही. त्यांना तिकडून इथे आणणं हे जोखमीचं काम आहे, असा दावा पाकिस्तान सरकारनं केला आहे. एका पाकिस्तानी विद्यार्थ्यानं सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितलं की, आम्ही अनेक तास स्वतःला खोलीमध्ये बंद करून घेत आहोत.
Coronavirus : चीनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना परत आणण्यास पाकचा नकार; इम्रान खान ट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2020 5:36 PM