नवी दिल्ली – चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसने जगातील अनेक देशात शिरकाव केला आहे. पाकिस्तानमध्येही कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या हजारांच्या वर गेली आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानचे कोरोना व्हायरसमुळे कंबरडे मोडले आहे. कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी पाकिस्तानकडे अत्यावश्यक सुविधाही उपलब्ध नाहीत अशी बिकट परिस्थिती त्यांच्यावर आली आहे.
कोरोनामुळे पाकच्या नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलं असताना शुक्रवारपासून सोशल मीडियात आलेल्या एका बातमीनं पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनाही कोरोनाची लागण झाल्याची पोस्ट व्हायरल झाली आहे. या बातमीची चर्चा पाकमध्ये सध्या सुरु आहे. पाकचे पंतप्रधान इमरान खान यांना कोरोना झाला असेल तर आमचं काय होणार असाच प्रश्न लोकांमध्ये उपस्थित होऊ लागला आहे.
इमरान खान यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली. राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली. काही दिवसांपूर्वी इमरान खान यांनी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषेदत अनेक पत्रकारही उपस्थित होते. त्यामुळे इमरान खान यांनी असं का केलं? असा सवाल विरोधकांनी केला आहे. तर वाढत्या अफवा लक्षात घेता पाकिस्तानचे तहरिक ए इंसाफचे खासदार फैसल जावेद यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
फैसल जावेद यांनी ट्विटरवरील पोस्टमध्ये खुलासा केला की, सोशल मीडिया आणि बातम्यांमध्ये जी बातमी सुरु आहे ती चुकीची आहे. पंतप्रधान इमरान खान यांची तब्येत ठीक आहे. त्यांना कोरोनाची लागण झालेली नाही. त्यामुळे अशा खोट्या बातम्या आणि अफवा पसरवू नका. तसेच लोकांनीही यावर विश्वास ठेवू नका असं आवाहन त्यांनी केलं आहे.
इमरान खान यांना कोरोना झाल्याची बातमी पसरली कशी?
लंडनमधील न्यूज मीडिया एराइज वर्ल्ड यांनी ब्रेकिंग न्यूजच्या टीकरमध्ये ही बातमी चालवली. या बातमीपूर्वी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याची बातमी होती. याच दरम्यान एराइज न्यूजने इमरान खान यांच्याबाबत ही बातमी प्रसारित केली. ब्रिटनमध्ये राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांनी ही बातमी ट्विटरवर पोस्ट केली. त्यानंतर वेगाने ही बातमी व्हायरल झाली. त्यानंतर बातमीचा व्हिडीओही काही लोकांनी पोस्ट केला. पंतप्रधान इमरान खान यांच्या जवळचे लोक फोनवरुन त्यांची विचारपूस करत होते. त्यानंतर पीटीआयच्या खासदाराने या बातमीचं खंडन केले.